
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
महाराष्ट्रासाठी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर पदाचा राजीनामा दिला असून, आता राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
सी. पी. राधाकृष्णन यांना एनडीएच्या वतीने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरुद्ध इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे रिंगणात होते. या निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला आणि ते देशाचे उपराष्ट्रपती झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील नवे राज्यपाल कोण असतील याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली होती.
या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. गुजरातचे विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडेच महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते आता गुजरातसोबतच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही कार्यभार पाहणार आहेत.
आचार्य देवव्रत हे शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत.
2015 मध्ये त्यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती. जवळपास चार वर्षे म्हणजे 2015 ते 2019 पर्यंत त्यांनी हिमाचलचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.
त्यानंतर 2019 मध्ये ते गुजरातचे राज्यपाल झाले.
आता त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचीही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपतीपदी झालेल्या निवडीनंतर राज्यपालपद रिकामे राहिल्यामुळे महाराष्ट्रात नव्या नियुक्तीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, अखेर राष्ट्रपती भवनाकडून अधिकृत आदेश जाहीर होताच या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत कार्यरत होणार आहेत. ते गुजरातसोबत महाराष्ट्राची जबाबदारीही सांभाळतील. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर आणि महत्त्वाच्या घटनांवर त्यांचा प्रभाव निश्चितच पाहायला मिळणार आहे.