
माणदेश एक्सप्रेस न्युज
पुणे: महाराष्ट्र राज्याची छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ओळख निर्माण झाली. सध्याचे हैदराबाद हे निजामांचे राज्य तर दिल्लीला मोगलांचे राज्य म्हटले जायचे. एकमेव महाराष्ट्र राज्याला कधीच भोसलेंचे राज्य म्हटले गेले नाही तर ते सर्वसामान्य जनतेचे तथा रयतेचे राज्य म्हटले जायचे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवपुत्र महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, लेखक श्रीराम पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अॅड. शैलेजा मोळक, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर मोळक, सचिव प्रज्ञेश मोळक यांसह मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी शिवपुत्र छत्रपती शंभुराजे पुरस्कार इतिहास संशोधक डॉ. प्रकाश पवार यांना तर महाराणी ताराराणी पुरस्कार माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चेतना गाला – सिन्हा यांना प्रदान करण्यात आला. अॅड. शैलेजा मोळक लिखित जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्त्वान लेकी भाग -2 व रजिया सुलताना लिखित ताराबाई शिंदेच्या निबंधातील सामाजिक वास्तव या पुस्तकांचे प्रकाशन ही करण्यात आले. त्याचबरोबर शिवस्पर्श दत्तक योजनेतील 5 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
पवार म्हणाले, महाराष्ट्रातील माणदेशी हा भाग नेहमीच दुष्काळी मानला जातो. केंद्रामध्ये कृषी खात्याची जबाबदारी सांभाळत असताना माणदेशीसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला होता. याच माण मतदारसंघाने मला संसदेत ही पाठवलेले आहे. या माणदेशाला दुष्काळाचा रोग असला तरी अनेक कर्तुत्ववान माणसे या देशाला पर्यायाने राज्याला दिलेली आहेत. ज्या गीत रामायण ऐकण्यासाठी रस्ते ओस पडायचे ते गदिमा, पी सावळाराम, ज्यांनी राज्यात पहिली सर्कस ही संकल्पना सुरु केली ते बबन माळी, प्रशासनातील अनेक अधिकारी हे याच माणदेशाने दिलेले आहेत. त्यामुळे दुष्काळी परिसर असला तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व दाखवुन यशस्वी झालेले ही पाहण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.