
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
राज्यातील कर्जाचा बोजा प्रचंड वाढला असून, महाराष्ट्राची आर्थिक अवस्था नेपाळसारखी झाली आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. “लाकडी बहिण योजना, कौशल्य विकास योजना आणि एसआरए योजनांमुळे राज्यावर तब्बल ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. गेल्या तीन महिन्यांत २४ हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे,” असे राऊत यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. आम्ही या संदर्भात नेपाळचे उदाहरण दिले की, ते आम्हाला माओवादी ठरवतात. पण वास्तव असे आहे की नेपाळही आर्थिक लुटीमुळे कोसळला. तिथल्या जनतेने असंतोष व्यक्त करून सरकारविरोधात बंड केले. महाराष्ट्राची परिस्थितीही त्याच मार्गावर जात आहे.”
राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार हा कौशल्य विकास खात्यात होत असल्याचा दावा राऊत यांनी केला. “मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्य विकास खात्यामध्ये प्रचंड गैरव्यवहार सुरू आहे. कौशल्य विकासाच्या नावाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटले जात आहेत. ९ लाख कोटींच्या कर्जाला जबाबदार कोण? राज्याच्या तिजोरीत जाणारा पैसा नेमका कोणाच्या खिशात जातोय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनाही राऊत यांनी लक्ष्य केले. “आर्थिक शिस्तीबाबत नेहमी बोलणारे अजित पवार आता गप्प का बसले आहेत? राज्यावर प्रचंड कर्ज असताना, अजित पवारांनी स्पष्ट उत्तर द्यायला हवे,” असे त्यांनी म्हटले.
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत असल्याकडे लक्ष वेधत राऊत म्हणाले, “राज्य सरकारने घेतलेले कर्ज जर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरले असते, तर आज आत्महत्यांचे संकट कमी झाले असते. सरकारने आता आणखी एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. अन्यथा आत्महत्यांचे प्रमाण थांबणार नाही,” अशी मागणीही त्यांनी केली.
राऊत यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या अर्थकारभाराविषयी नवे वादंग निर्माण झाले आहे. कर्जाचा बोजा, भ्रष्टाचाराचे आरोप, शेतकरी आत्महत्या आणि आर्थिक शिस्तीवरून सरकारविरोधी राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.