
माणदेश एक्सप्रेस न्युज | मुंबई :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी, पुरस्थिती आणि नदीकाठच्या भागातील तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम 2025 (Kharip 2025) अक्षरशः पावसाने उध्वस्त केला आहे. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू असतानाच, मदत व पुनर्वसन विभागाने 2,215 कोटी रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे.
या मदतीचा थेट लाभ 31.64 लाख शेतकऱ्यांना होणार असून, ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आजच जाहीर झाला आहे.
राज्यातील पावसाच्या तडाख्याने जवळपास 70 लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अधिकृत आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. केवळ शेतीच नव्हे, तर अनेक गावांत घरांचे, शाळांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यांनुसार जवळपास 32 लाख शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नोंदवले गेले आहे. त्यांना मदतीचा पहिला हप्ता म्हणून 2,215 कोटींची रक्कम वितरित केली जाणार आहे.
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रामपंचायत, महसूल प्रशासन आणि कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानाची नोंद करत आहेत. आधी विदर्भात मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिघडली होती. आता मराठवाड्यातही जोरदार पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले आहे.
कुणाला मिळणार मदत?
खरीप हंगाम 2025 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य
किमान 33 टक्क्यांहून अधिक पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश
जिल्हा व तालुका प्रशासनाने पंचनाम्यात नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा
मदतीचा हा पहिला टप्पा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अद्याप अनेक जिल्ह्यांचे पंचनामे सुरू असून, नुकसानाचे अंतिम आकडे आल्यानंतर आणखी मदतीचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत सरकारकडून मिळाले आहेत.
थोडक्यात, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पावसाच्या प्रलयात ही मदत म्हणजे दिलासा ठरणार आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत कधी पोहोचते आणि त्यातून किती प्रमाणात त्यांचे प्रश्न सुटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.