
माणदेश एक्सप्रेस न्युज | मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पावसामुळे घरांचे, शेतीचे आणि रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने (IMD) आज (१७ सप्टेंबर) पुन्हा एकदा इशारा दिला असून राज्यातील १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २ ते ३ दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस झाला असून आजदेखील ढगाळ वातावरणासह जोरदार सरी कोसळतील असा अंदाज आहे. मुंबईचे कमाल तापमान २९ डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान २४ डिग्री सेल्सियस इतके राहील.
कोकण विभागात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून येथे जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे.
तथापि, कोल्हापूर जिल्ह्याला अलर्ट नसला तरी ढगाळ वातावरण कायम राहील.
मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाचा सिलसिला सुरू असून आजदेखील ८ ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वारे ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या विभागात मोठा अलर्ट नसला तरी नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भ – तेलंगाना सीमेवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. गरज नसताना प्रवास टाळावा, तसेच शेतकऱ्यांनी उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने खबरदारीचे उपाययोजना कराव्यात असा सल्ला देण्यात आला आहे.
नागरिकांसाठी हा इशारा अत्यंत महत्त्वाचा असून हवामानातील बदल लक्षात घेऊन सुरक्षिततेसाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.