
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी दिल्ली :
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी जैन मठात दीर्घकाळ राहिलेली हत्तीण माधुरी उर्फ महादेवी हिच्या पुनर्वसन व परताव्याबाबतच्या वादग्रस्त प्रकरणात आज (दि.१२ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. मात्र, तुर्त हत्तीणीला कोल्हापुरात परत पाठवण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. उलटपक्षी, हे प्रकरण उच्चस्तरीय (हायपॉवर) कमिटीकडे सोपवण्यावर सर्व पक्षकारांत एकमत झाले.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वकीलांनी ठामपणे सांगितले की,
“माधुरी हत्तीण मूळची कोल्हापूरची असून तिला वनताराकडे हलवण्यात आले आहे. ती पुन्हा कोल्हापुरात परत पाठवावी,” अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली.
यावर न्यायालयाने थेट टिप्पणी करत म्हटले की, “हत्तीणीची तब्येत खूपच खराब आहे. त्यामुळे आम्ही वनताराशी थेट संवाद साधू.”
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा प्रश्न विचारला —
“तुम्ही लोकांच्या धार्मिक भावना पाहता आहात की प्राण्याच्या आरोग्याचा विचार करता आहात? कोर्टाचा निर्णय वेगळा आणि जनभावना वेगळ्या असू शकतात. मग तुम्ही कोणाला प्राधान्य देता?”
राज्य सरकारने यावर उत्तर देताना सांगितले की, हे प्रकरण हायपॉवर कमिटीकडे सोपवण्यात येणार आहे. मात्र, कोर्टाने या ‘हायपॉवर कमिटी’चे स्वरूप आणि कार्यपद्धती काय असेल, याबाबत स्पष्टिकरण मागितले.
पार्श्वभूमी :
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी जैन मठात मागील ३३ वर्षांपासून माधुरी हत्तीण होती. मठ आणि स्थानिक नागरिकांनी तिला धार्मिक श्रद्धेने जोपासले.वादाची सुरुवात :
प्राणीसंवर्धन संस्था आणि न्यायालयाच्या आदेशानुसार तिच्या आरोग्य व कल्याणाचा विचार करून तिला जामनगर येथील ‘वनतारा’ पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले.मठ आणि स्थानिकांचा विरोध :
नांदणी मठ तसेच स्थानिक नागरिकांचा ठाम आग्रह आहे की, “माधुरी आमच्या धार्मिक भावनांशी जोडलेली आहे. तिला परत कोल्हापूरात आणलं पाहिजे.”कायदेशीर कोंडी :
मुंबई उच्च न्यायालयाने हत्तीणीला वनतारामध्येच ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र, या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.सध्याची स्थिती :
प्रकरण आता जनभावना, धार्मिक श्रद्धा आणि प्राणीसंवर्धन कायदे या तिन्हींच्या कचाट्यात अडकले असून, राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, माधुरी हत्तीण परत कोल्हापुरात पाठवायची की वनतारामध्येच ठेवायची, याबाबतचा अंतिम निर्णय उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर अवलंबून राहील. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक, नांदणी मठ, तसेच प्राणीसंवर्धन संस्था सर्वांच्या नजरा आता या कमिटीकडे लागल्या आहेत.
माधुरी हत्तीण परताव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय झाला नाही.
प्रकरण हायपॉवर कमिटीकडे सोपवण्यात आले.
जनभावना व प्राणीसंवर्धन या दोन्ही बाजूंचा विचार करूनच अंतिम निकाल ठरणार.