
माणदेश एक्सप्रेस न्यूज ; आटपाडी/प्रतिनिधी : माडगुळे (ता. आटपाडी) येथे एका स्थानिक व्यापाऱ्याला शिवीगाळ व जीव घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी तिघांविरुद्ध आटपाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अमोल भालचंद्र विभुते (वय ४३, रा. माडगुळे, व्यवसाय – ज्वेलरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे सांगोला येथे ‘माडगुळकर ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता ते दुकान बंद करून गाडी (क्र. MH 10 EE 9101) ने माडगुळेकडे येत असताना गावातील ग्रामपंचायत जवळील मेन चौकात चैतन्य बापूसो विभुते व रणजित चंद्रकांत विभुते या दोघांनी त्यांची गाडी अडविली.
त्या वेळी चैतन्य विभुतेच्या हातात काठी होती. दोघांनी तक्रारदाराला शिवीगाळ करून “तुला जिवंत सोडत नाही” अशी धमकी दिली. तसेच गाडी जाऊ न देत अडथळा निर्माण केला. त्यातून गाडी पुढे नेत असताना चैतन्य विभुते याने काठीने गाडीच्या डाव्या बाजूच्या दरवाज्यावरील फायबर पट्टीवर मारून नुकसान केले. त्या वेळी तक्रारदारासोबत त्यांचा मुलगा विराज हाही होता.
घरी पोहोचल्यावर बापुसो आत्माराम विभुते यांचा फोन आला. त्यांनीही तक्रारदार अमोल विभुते व त्यांच्या आई भामाबाई यांना फोनवरून वाईट, अश्लील शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेचा उगम रेशनिंगच्या वादातून झाला असल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराच्या आत्येला (सुमन शेगावकर) व त्यांच्या पतीला बापुसो विभुते यांनी रेशनिंग दिले नाही, याबाबत तक्रारदाराने बापुसो विभुते यांना फोनवरून जाब विचारल्याचा राग मनात धरून हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी चैतन्य बापूसो विभुते, रणजित चंद्रकांत विभुते व बापुसो आत्माराम विभुते (सर्व रा. माडगुळे) यांच्याविरुद्ध अमोल विभुते यांनी आटपाडी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.