११ वीच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती

0
645

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | पुणे :

 हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली असून संपूर्ण भागात मोठी खळबळ उडाली आहे. अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गातील १७ वर्षीय मित्राने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या अत्याचारांचा भयंकर परिणाम म्हणून पीडित मुलगी तब्बल सात महिन्यांची गर्भवती झाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपी हे दोघे एकाच नामांकित शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत होते. शाळेत जाणे-येणे, एकत्र अभ्यास करणे या कारणामुळे त्यांच्यात ओळख व जवळीक निर्माण झाली. सुरुवातीला मैत्रीचं नातं असले तरी हळूहळू आरोपीने चुकीच्या मार्गाचा अवलंब करून मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेतला.


जानेवारी २०२५ मध्ये आरोपीने प्रथमच मुलीवर जबरदस्ती करत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर धमकावून आणि मानसिक दडपण आणून आरोपी वारंवार असे कृत्य करत राहिला. जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या तब्येतीत बदल दिसत असल्यामुळे कुटुंबीयांनी तपासणी करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे सत्य उघड झाले आणि पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली.


तक्रारीनंतर लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल न्याय कायद्याअंतर्गत त्याच्यावर प्रक्रिया राबवली जात आहे. पीडित मुलीचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून वैद्यकीय तपासणी अहवाल सुद्धा पोलिसांकडे जमा करण्यात आला आहे.


या धक्कादायक घटनेमुळे लोणी काळभोर परिसरात तणावाचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. समाजातील मुलींवर होत असलेले असे अत्याचार थांबवण्यासाठी प्रशासन आणि समाजाने जागरूक होण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here