sangali : आटपाडी तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग

0
901

माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, असे आदेश सर्वेाच्च न्यायालयाने दिल्यानंतर आटपाडी तालुक्यातील राजकीय पक्षाच्या हालचाली काही प्रमाणात सुरु झाल्या आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर इच्छुक मंडळींची लगीणघाई सुरू झाली असून त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे फेर्‍या वाढू लागल्या आहेत.

 

आटपाडी तालुक्यात भाजप, शिंदे शिवसेना यांची ताकद मजबूत आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर हे निवडून आले असल्याने त्यांची ताकद काही प्रमाणात वाढली आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांचे बंधू माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी निवडणुकीसाठी सध्या जुळवाजुळव सुरु केली आहे. देशमुख गटाचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख हे राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले आहेत. तर त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख हे अजूनही भाजपमध्येच आहेत. त्यामुळे देशमुख गटाचे अनेक कार्यकर्ते संभ्रमात असले, तरी ऐनवेळी आदेशाने तासात एकत्र येतात.

 

तालुक्यात काँग्रेसची ताकद पश्चिम भागात असून जयदीप भोसले यांच्यापुढे निवडणुकीचे मोठे आव्हान असणार आहे. कारण मागील ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा स्वत:च्या गावात पराभव झाला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला माणणारे कार्यकर्ते आटपाडी तालुक्यात अधिक आहे. परंतु याचे रूपांतर मतात होणे अपेक्षित आहे.

 

आटपाडी नगरपंचायत, आटपाडी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका समोर असल्याने, या स्थानिक संस्थावर प्रशासक असल्याने सामान्य जनतेची कामे मोठ्या प्रमाणात रेंगाळली आहेत. संबंधित संस्थेचे प्रमुखच त्या संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्त केल्याने सामान्य लोकांची कामे तातडीने मार्गी लागत नाहीत.

 

या संस्थावर सदस्य नसल्याने तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न या जनतेला आहे. दोन वर्षाहून अधिक काळ या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात होत्या. आता कोर्टाचे फर्मान आल्याने सगळेच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करू लागले आहेत. आटपाडी ग्रामपंचायतवर यापूर्वी सर्व सदस्य हे देशमुख गटाचे सरपंच तानाजीराव पाटील यांच्या गटाचा होता.

 

आटपाडी नगरपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी देशमुख गट कुणाशी युती करणार, तानाजीराव पाटील गट स्वबळावर निवडणुक लढविणार का? भारतदादा पाटील यांचा गट पाठींबा देणार का? ते देखील स्वबळावर लढणार हे जर-तर असले तरी, भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर व ब्रम्हानंद पडळकर यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणता पक्ष कोणाबरोबर युती व आघाडी करील यावर पुढील गणित अवलंबून असणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here