
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 750 अर्जांची तात्पुरती यादी व 250 अर्जांची तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड येथे जनतेसाठी उपलब्ध असल्याचे असे समाज कल्याण सांगलीचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. योजनेतील सुधारणांबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात येवून दिनांक 31 ऑक्टोबर 2024 अखेर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. यानुसार रेल्वेच्या आसन क्षमतेच्या प्रमाणात 750 अर्जांची तात्पुरती यादी व 250 अर्जांची तात्पुरती प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जिल्हास्तरीय समिती उपाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली लॉटरी पध्दतीने लाभार्थींची निवड करण्यात आली असून यास समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता दिली आहे.
ही यादी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड येथे जनतेसाठी उपलब्ध आहे. तीर्थदर्शनासाठी जाण्याची तारीख निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहेत. त्यांच्याकडून तारीख प्राप्त होताच जाहीर करण्यात येईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.