
माणदेश एक्सप्रेस न्युज
पुणे : राजकीय आयुष्याच्या वाटचालीत नक्की कोण कोणाचा प्रतिस्पर्धी, हे सांगणे अवघड असते. एकमेकांचे पाय ओढणे, एकमेकांच्या उरावर बसणे याला रोजच्या राजकीय जीवनात सामोरे जावे लागते. कोण कोणाला धोबीपछाड करेल, हे सांगता येत नाही. कुस्तीप्रमाणेच राजकारणातही डावपेच आणि डाव-प्रतिडाव सुरू असतात, असे मत आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
कै. पै. वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठानतर्फे कै. पै. वसंतराव सयाजी बेनकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित मुलींच्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष वैजयंती वसंतराव बेनकर उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता मुलांप्रमाणेच मुलींना देखील क्रीडा क्षेत्रात समान संधी मिळाल्यास त्या त्यांची चुणूक दाखवून देतात. लहान वयातच मुला-मुलींवर खेळांचे संस्कार झाल्यास ते ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यापर्यंत मजल मारू शकतात.
शहरांसोबतच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुला-मुलींचे क्रीडाकौशल्य ओळखून त्यांना वेळीच प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी सोसलेले कष्ट आणि हालअपेष्टा याची जाणीव ठेवत समाजाने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आग्रही राहिले पाहिजे.
मुलींनी खेळांबरोबरच राजकारणात येणे देखील आवश्यक आहे. कारण, मोदी सरकार 2029 मध्ये विधानसभा आणि विधान परिषदेसाठी महिलांना 50 टक्के आरक्षण लागू करणार आहे. राजकीय घराण्यांचा धांडोळा घेतला असता वडिलांचा राजकीय वारसा चालविणार्यार अनेक मुली आपल्याला सध्याच्या राजकारणात दिसून येतात. शरद पवार- सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक उदाहरणे आढळून येत असल्याचे भुजबळ यांनी या वेळी सांगितले.