
माणदेश एक्सप्रेस न्यूज | शिराळा :
गिरजवडे (ता. शिराळा) येथील मुळीकवाडी येथे सोमवारी सायंकाळी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अवघ्या चार वर्षांच्या आरव अमोल मुळीक या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. प्रसंगावधान दाखवत ग्रामस्थांनी बिबट्याच्या तावडीतून आरवची सुटका केली. मात्र, तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरव आपल्या आजोबा बजरंग मुळीक यांच्यासोबत गावाजवळील पाचिरो पाडा शिवारात पशुखाद्यासाठी गवत आणायला गेला होता. त्याच वेळी सोबत काशिनाथ मुळीक, शोभा मुळीक आणि राजेश्री मुळीक हे देखील होते. अचानक झाडांच्या आड दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालत आरवला गाठले आणि त्याला उसाच्या शेतात फरपटत नेले.
क्षणाचाही विलंब न करता काशिनाथ मुळीक यांनी धाडसाने आरवकडे धाव घेतली आणि काठीने व दगडांनी बिबट्याला हुसकावून लावले. त्यांच्या प्रसंगावधानाने आरवचा जीव वाचला. बजरंग आणि मोहन मुळीक यांनी तत्काळ त्याला उचलून शिराळा उपजिल्हा रुग्णालयात नेले.
शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. अनिरुद्ध काकडे आणि डॉ. मनोज महिंद यांनी आरववर तातडीने उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला कराड येथील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. बालकाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर खोल जखमा झाल्या आहेत, मात्र तो धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर अवघ्या काही तासातच त्याच बिबट्याने घागरेवाडी येथे बांधकाम स्थळाजवळ कामगारांच्या दुचाकीवर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या सलग दोन घटनांमुळे गिरजवडे व परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरपंच सचिन देसाई यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनाधिकारी एकनाथ पारधी, अनिल वाजे, स्वाती कोकरे, प्रा. सुशीलकुमार गायकवाड आणि सत्यजीत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन आरवची भेट घेतली आणि घटनेचा आढावा घेतला.
यापूर्वीही शिराळा व शाहूवाडी तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक बालकांचे बळी गेले आहेत, तर काही शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. पाळीव जनावरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांनी वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे. तसेच मुलांना शेतात एकटे पाठवू नये आणि रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, असा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.
आरवची सुटका करणारे काशिनाथ मुळीक आणि अन्य ग्रामस्थांचे धाडस खरोखरच कौतुकास्पद ठरले आहे. त्यांच्या तत्परतेमुळे एक निरागस जीव वाचला, अन्यथा आणखी एक दुर्दैवी घटना घडली असती.
शिराळा परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने आणि वनविभागाने तातडीने कारवाई करून या धोक्याला आळा घालणे गरजेचे आहे.