
माणदेश एक्सप्रेस/पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवल्याने त्यांच्या विरोधी पक्षातील नेत्यांचा ओढा वाढला आहे. अनेक नेत्यांनी महायुतीतील वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. अनेक नेते प्रवेश करणार असल्याचे दावेही केले जात आहेत. अशातच भाजपचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यातील ३६ दुष्काळग्रस्त गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी परिषद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना भाजपचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी बाबाजी काळे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.
जयकुमार गोरे खेडचे आमदार बाबाजी काळे यांना उद्देशून म्हणाले की, ‘लोक आपल्याला निवडून देतात तेव्हा त्यांना आपल्याकडून प्रचंड अपेक्षा असतात. आणि त्या पूर्ण केल्या नाहीत, तर लोक दुसऱ्या कुणाचा शोध घेत राहतात. लोक कधीही बाभळीच्या झाडाखाली उभे राहत नाहीत.’
जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, ‘लोक आंब्याच्या झाडाची सावली पाहतात आणि आंबे कुठे मिळतात हेच शोधतात. त्यामुळे तुम्ही आंब्याच्या झाडाकडे या आणि पाण्याचा प्रश्न सोडवा’, असे म्हणत जयकुमार गोरेंनी आमदार बाबाजी काळेंना महायुती सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली.
पाणीटंचाईसंदर्भात झालेल्या या बैठकीत जयकुमार गोरे यांनी राजकीय विधान केले. त्यामुळे पाणी प्रश्नाऐवजी याच विधानाची जास्त चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. स्थानिक राजकारणातही जयकुमार गोरेंच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.(स्रोत-लोकमत)