
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेचा प्रचार करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्या सहाय्याने योजनेची माहिती असणारा “जलरथ” जिल्ह्यामध्ये फिरवणार आहे. या “जल रथ” चे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, मृद व जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. व्ही. आजगेकर, भारतीय जैन संघटना सांगलीचे राज्य संचालक राजगोंडा पाटील, आण्णासाहेब उपाध्ये, धन्यकुमार शेट्टी, वसंत पाटील, दीपक पाटील, बी. आर. पाटील, जिल्हा समन्वयक विकास शेळके व सर्व तालुका समिती (कार्यकारिणी) सदस्य, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आदि उपस्थित होते. या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य बीजेएसने स्वीकारले आहे. या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त गावांनी या योजनेत सहभाग घ्यावा, यासाठी बीजेएस प्रयत्न करणार आहे. भारतीय जैन संघटनेच्या या उपक्रमासाठी सुहाना स्पायसेस यांनी सहकार्य केले आहे.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जलाशयांमधील गाळ काढण्याचे काम प्रशासनाने निवडलेल्या स्वयंसेवी संस्था किंवा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शासनाकडून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी शासनाच्यावतीने अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इंधनाचा खर्च शासन करणार असून संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनामार्फत निधी वितरित केला जाईल. या योजनांमुळे तलावांची पाणी साठवण क्षमता वाढेल, नाल्यांची वहन क्षमता सुधारेल, भूजल पातळीत वाढ होईल आणि शेतीसाठी उपलब्ध पाण्याचे प्रमाण वाढेल. शेतात गाळ टाकल्यामुळे मातीचा पोत सुधारेल, जमिनीची सुपीकता वाढेल आणि शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.