फीच्या पैशावरून मुलाचा संताप, वडिलांची काठीने हत्या

0
262

माणदेश एक्सप्रेस न्यूज | लातूर :

वडील–मुलांचं नातं विश्वास, प्रेम आणि ममतेचं मानलं जातं. मात्र या नात्यालाच काळिमा फासणारी एक भयंकर घटना लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात उघडकीस आली आहे. परीक्षेची फी भरण्यासाठी ठेवलेले पैसे वडिलांनी घरगुती गरज म्हणून गॅस सिलेंडर खरेदीसाठी वापरल्याचं समजताच रागाच्या भरात मुलाने आपल्या वडिलांचा जीव घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ही घटना चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावात घडली. या प्रकरणात देविदास पांचाळ (वय 70, रा. हिंपळनेर) यांचा खून झालेला असून, त्यांचा मुलगा अजय पांचाळ (वय 24) याला पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक देविदास पांचाळ आपल्या पत्नी व मुलगा अजयसोबत हिंपळनेर येथे राहत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मुलगा अजय हा स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीची तयारी करत होता. त्यासाठी त्याने वडिलांकडे वारंवार परीक्षेची फी भरण्यासाठी पैसे मागितले होते.

दरम्यान, सततच्या पावसामुळे घरातील लाकूड व जळणाचं साहित्य भिजल्याने चूल पेटवणं अशक्य झालं. यामुळे घरात स्वयंपाक करण्याची वेळ कठीण झाली. अशा वेळी देविदास यांनी फी भरण्यासाठी ठेवलेले संपूर्ण एक हजार रुपये खर्च करून गॅस सिलेंडर आणला.


फीचे पैसे खर्च झाल्याचं समजताच अजय संतापला. यावरून त्याचा आई-वडिलांशी जोरदार वाद झाला. आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या अजयने घरातील काठी उचलली आणि वडिलांवर तुटून पडला. डोक्यात जबर मार लागल्याने देविदास गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, चाकूर येथे दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान सततच्या रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत घोषित करताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.


या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुरकुटे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान आरोपी मुलगा अजय पांचाळ याला बेड्या ठोकून पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


एका मुलाने संतापाच्या भरात वडिलांचा जीव घेतल्याची घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. गरीबी, ताणतणाव आणि घरातील वाद इतक्या टोकाला जाऊ शकतात याची ही धक्कादायक जाणीव स्थानिकांना झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here