भरधाव कारची भीषण धडक; दोन चुलतभाऊ आणि मित्राचा जागीच मृत्यू

0
236

माणदेश एक्सप्रेस न्यूज | लातूर :
लातूर जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात दोन चुलतभावांसह त्यांच्या जिवलग मित्राचा मृत्यू झाला. औसा-लामजना मार्गावरील दावतपूर पाटीजवळ हा अपघात रात्री ११:१५ वाजता घडला. या घटनेमुळे सरवडी (ता. निलंगा) गावात हळहळ पसरली आहे.

या अपघातात सोमनाथ दयानंद हिप्परगे (२२), अभिजित शाहुराज इंगळे (२३) आणि दिगंबर दत्ता इंगळे (२७, सर्व रा. सरवडी, ता. निलंगा) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


अपघात कसा घडला?

रविवारी रात्री सरवडीतील अभिजित इंगळे, दिगंबर इंगळे हे दोघे चुलतभाऊ व त्यांचा मित्र सोमनाथ हिप्परगे हे तिघे दुचाकीवरून औसा-लामजना मार्गे गावाकडे निघाले होते. ते दावतपूर पाटी ते वाघोली पाटी दरम्यान आले असता भरधाव वेगातील कार (क्र. एमएच-१४ एफजी-७१७२) ने समोरून धडक दिली.
या जोरदार धडकेत सोमनाथचा जागीच मृत्यू झाला, तर अभिजित व दिगंबर गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघा जखमींना औसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


गावभर शोककळा

सरवडी गावातील हे तिघे जिवलग मित्र असल्याने त्यांच्या मृत्यूच्या बातमीने गावावर शोककळा पसरली. तिघांचे पार्थिव गावात आणले असता वातावरण करुण व शोकमग्न झाले. शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


एकुलता एक मुलगा हिरावल्याने आईचा हंबरडा

  • अभिजित इंगळे : तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी आहेत. अविवाहित असलेल्या अभिजितच्या मृत्यूने कुटुंब उद्ध्वस्त झाले असून आई व बहिणींचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

  • सोमनाथ हिप्परगे : तो पदवीधर व अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ आहेत. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंब हादरले आहे.

  • दिगंबर इंगळे : विवाहित दिगंबरच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ व तीन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


कुटुंबीय व नातेवाइकांचा आक्रोश

मृतदेह गावात पोहोचताच कुटुंबीय व नातेवाईकांनी हंबरडा फोडला. जिवलग मित्रांचा एकाचवेळी झालेला अंत हा गावासाठी मोठा धक्का ठरला. गावातील सर्वच वयोगटातील नागरिक त्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले. सोमनाथचा अंत्यसंस्कार शेतात करण्यात आला, तर अभिजित व दिगंबर यांचे अंत्यसंस्कार जवळच झाले.


अपघातग्रस्त कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

या अपघाताबाबत औसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत. भरधाव कारच्या निष्काळजीपणामुळे तिघा तरुणांचे आयुष्य संपुष्टात आल्याची हळहळ ग्रामस्थ व कुटुंबीय व्यक्त करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here