मुंबई महापालिका कार्यकारी सहायक या पदासाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

0
152

मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. कार्यकारी सहायक या पदाचं जुनं नाव लिपीक असं आहे. कार्यकारी सहायक पदाच्या 1846 जागांसाठी मुंबई महापालिकेनं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. या पदासाठी अर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या भरतीमध्ये मुंबई महापालिकेनं दहावी उत्तीर्ण असण्यासंदर्भात एक अट निश्चित केली होती. ती अट बदलण्याची मागणी या भरतीसाठी अर्ज करणारे विद्यार्थी, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील केली होती. मात्र, आज अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असूनही मुंबई महापालिकेनं त्या नियमात बदल केलेला नाही. आज मुंबई महापालिका कार्यकारी सहायक भरतीमधील ती अट बदलणार की आपल्या भूमिकेवर ठाम राहणार हे पाहावं लागेल.

मुंबई महापालिकेची 1846 पदांसाठी भरती
मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक पदाच्या 1846 जागांसाठी 20 ऑगस्ट 2024 पासून अर्ज मागवले होते. आज अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज रात्री 11.59 मिनिटांपर्यंत अर्ज सादर करता येतील.

मुंबई महापालिका ‘ती’ अट बदलणार का?
मुंबई महापालिका भरतीच्या अटी निश्चित करताना शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील एक अट निश्चित करण्यात आली होती. त्या अटीनुसार या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार पहिल्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे. याशिवाय पदवी परीक्षा कोणत्याही विद्याशाखेतून उत्तीर्ण झाला असला तरी संबंधित उमेदवार 45 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. या अटीवर विद्यार्थी, उमेदवार आणि विविध राजकीय पक्षांचे नेते यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ही अट मागं घ्यावी, अशी मागणी केली होती. काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात सर्वप्रथम मुद्दा मांडत अट मागं घेण्याची मागणी केली होती.

दरम्यान, मुंबई महापालिका कार्यकारी सहायक पदाच्या भरतीसाठी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, मुंबई महापालिकेकडून भरती संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई महानगरपालिका प्रशासन राज्य सरकारमधील सत्ताधारी नेते आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसह विद्यार्थ्यांच्या मागणीला मान्यता देत अट शिथील करुन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देणार की नाही हे पाहावं लागेल.