माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एसटी महामंडळातील कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आज पासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आटपाडी आगरामध्ये देखील कामगार आंदोलनात सहभागी झाले असल्याने, एस.टी. च्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, कामगारांनी एस.टी. डेपो मध्ये आंदोलन सुरु केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य मागण्यांबाबत शासन दरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. ७ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोनही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासकीय व प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी व संयुक्त कृती समितीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगनू या मागण्यांवर येणारा वित्तीय भार आणि त्याची कशाप्रकारे सांगड घालावयाची यासंदर्भात उच्च अधिकार समितीसोबत आठवड्याभरात बैठक घेऊन सदरचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी सदर बैठकीत दिले होते. परंतु सदर बैठक संपन्न झाली नाही. त्यामुळे आजपासून आटपाडी आगारातील कामगारांनी काम बंद केले असून सर्व कामगार आंदोलनात सहभागी झाले असल्याने, आटपाडी आगारातून एकही फेरी मार्ग्रस्थ झाली नाही.