
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असते. देशभरातून भाविक बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लालबागच्या राजाच्या दरबारात दाखल होतात. राजकारणी, मान्यवर, सेलिब्रिटी यांच्याही उपस्थितीमुळे हा गणेशोत्सव अधिक रंगतदार होतो. यंदाही त्याला अपवाद नव्हता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. मात्र त्यांच्यासोबत आलेली एक बॉलिवूड अभिनेत्री सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
ही अभिनेत्री म्हणजे श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस. हिरव्या रंगाचा ड्रेस, डोक्यावर घेतलेला पदर आणि हातात दुर्वा – या पारंपरिक अंदाजात जॅकलिन दर्शनासाठी पोहोचली होती. पार्थ पवार आणि जॅकलिन एकत्र मंडपात प्रवेश करताच माध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले.
दानपेटीपाशी टिपलेले खास क्षण
दर्शनादरम्यानचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पार्थ पवार जॅकलिनच्या हातात दानपेटीत टाकण्यासाठी पैसे देताना दिसतात. त्या क्षणाचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामसह अनेक प्लॅटफॉर्मवर फिरत असून चाहत्यांच्या चर्चेला उधाण आले आहे.
आरतीतही झाली उपस्थिती
फक्त दर्शनच नाही, तर लालबागच्या राजाची आरती सुरू असताना देखील पार्थ पवार आणि जॅकलिन फर्नांडिस एकत्र उपस्थित होते. भाविकांसह त्यांनी आरतीत सहभाग घेतला. माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपलेले हे दृश्य अनेक न्यूज चॅनेल्स व सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत.
जॅकलिनची खास एन्ट्री
गणेशोत्सवात पहिल्यांदाच जॅकलिनने स्वतःच्या घरीही बाप्पाचे स्वागत केले आहे. तिने सोशल मीडियावर गणपती बाप्पाच्या आगमनाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. पारंपरिक वेषभूषेत तिचा हा अंदाज चाहत्यांना आवडत असून तिला प्रचंड शुभेच्छा मिळत आहेत.
लालबागचा राजा – कोट्यवधींचे श्रद्धास्थान
लालबागचा राजा हा मुंबईतील गणेशोत्सवाचा मुख्य आकर्षण आहे. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या या मंडळाच्या सजावटीची दरवर्षी उत्सुकता असते. यंदा लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आला असून खास सुवर्ण गजानन महाल साकारण्यात आला आहे.
पार्थ पवार आणि जॅकलिन फर्नांडिस यांना एकत्र पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या उपस्थितीने केवळ भाविकांचेच नाही तर सेलिब्रिटी फॅन्सचेही लक्ष वेधून घेतले.