
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
गणेशोत्सवाच्या उत्साहात बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीला वेग आला असतानाच, लालबाग राजाच्या परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या घटनेत दोन वर्षांची चंद्रा वजणदार हिचा जागीच मृत्यू झाला असून, 11 वर्षीय शैलू वजणदार हा गंभीर जखमी झाला आहे.
अपघात आज पहाटे सुमारे चारच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपलेली असताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना चिरडले. अपघातानंतर आरोपी वाहनचालकाने घटनास्थळी मदत न करता गाडी घेऊन फरार होण्याचा मार्ग स्वीकारला.
जखमी मुलांना स्थानिकांनी तत्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही दोन वर्षीय चंद्राला वाचवता आले नाही. गंभीर जखमी असलेला 11 वर्षीय शैलू याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेमुळे लालबाग राजाच्या परिसरात मोठी खळबळ उडाली. विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी आधीच गर्दी जमलेली असताना, अचानक घडलेल्या अपघातामुळे लोकांमध्ये संताप आणि दु:खाची लाट उसळली. अनेकांनी पुढे येऊन जखमी मुलांना मदत केली.
या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, आरोपी वाहनचालकाचा आणि त्याच्या गाडीचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल अशी अपेक्षा आहे.
मुंबईत गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषात लाखो भाविक सहभागी होत असतात. बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीत भक्तीमय वातावरण रंगत असतानाच घडलेल्या या अपघाताने उत्साहावर विरजण पडले आहे.