
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | अहिल्यानगर :
ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर पुन्हा एकदा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी अहिल्यानगर जिल्ह्यात घडली. हाके हे पाथर्डी तालुक्यातील सभेसाठी जात असताना आरणगाव रोडवर काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर दगडफेक करून लाठ्यांनी मारहाण केली. सुदैवाने हाके आणि त्यांच्यासोबत असलेले सहकारी यातून थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके यांची पाथर्डी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी ते सहकाऱ्यांसह गाडीतून निघाले होते. त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्तही होता. परंतु, आरणगाव रोडवरील एका हॉटेलसमोर हाके यांची कार पोहोचताच अज्ञात तरुणांनी अचानक दगडफेक केली. त्यानंतर काठ्यांनी गाडीवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात कारचे मोठे नुकसान झाले, मात्र कोणालाही दुखापत झाली नाही.
हल्ल्यानंतर हाके यांचा ताफा काही वेळ थांबला. त्याचवेळी हल्लेखोर तरुण घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
लक्ष्मण हाके यांच्याशी संबंधित सहकाऱ्यांवर मागील काही दिवसांत सलग हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत.
२२ सप्टेंबर रोजी हाके यांचे जवळचे सहकारी पवन कंवर यांच्यावर बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे ढाब्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ३०-४० जणांनी काठ्यांनी केलेल्या हल्ल्यात कंवर गंभीर जखमी झाले होते.
तर, हाके यांचे दुसरे सहकारी नवनाथ वाघमारे यांची कार काही दिवसांपूर्वीच जालना शहरात घरासमोर उभी असताना पेट्रोल टाकून जाळण्यात आली होती.
ओबीसी आंदोलनाचे नेते म्हणून आक्रमक भूमिका घेणारे लक्ष्मण हाके यांच्यावर हा दुसऱ्यांदा थेट हल्ला झाला आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराई येथे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्या वेळी आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता.
सततचे हल्ले, सहकाऱ्यांना लक्ष्य केलेल्या घटना आणि गाड्या जाळण्याचे प्रकार पाहता हाके गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनांमुळे ओबीसी आरक्षण चळवळीला विरोध करणाऱ्या शक्तींनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, पोलिसांनी अहिल्यानगरमधील ताज्या घटनेचा तपास वेगाने सुरू केल्याचे सांगितले आहे.