
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
आयएएस किंवा आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींना प्रेरणा देणारी एक असामान्य महिला अधिकारी – डी. रुपा! निडरपणे कायद्याचं पालन करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराविरोधात उभी राहणाऱ्या या आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या कारकिर्दीत धाडसी निर्णय घेत अनेक राजकीय नेत्यांनाही हादरवून सोडलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी एका मुख्यमंत्र्यालाही अटक करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते.
कोण आहे डी. रुपा?
कर्नाटकातील रहिवासी असलेल्या डी. रुपा यांनी कुवेम्पु विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण करत सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर त्यांनी यूपीएससीसाठी तयारी सुरू केली आणि वर्ष 2000 मध्ये त्यांनी देशात 43 वी रँक मिळवून आयपीएस सेवेत प्रवेश केला.
20 वर्षांत 40 वेळा बदली!
त्यांच्या निडर आणि प्रामाणिक कारभारामुळे त्यांच्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत तब्बल 40 वेळा बदली करण्यात आली. कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश अशा विविध राज्यांमध्ये त्यांनी सेवा बजावली. नियमांचे कठोर पालन, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारविरोधातील ठाम भूमिका यामुळे त्या अनेकांच्या रडारवर राहिल्या.
मुख्यमंत्र्यांनाही केली अटक!
सर्वात मोठा धक्का बसला तो 2007 साली, जेव्हा डी. रुपा यांनी मध्यप्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांना अटक केली. ही अटक कोर्टाच्या आदेशावरून करण्यात आली होती. एका सत्ताधारी मुख्यमंत्र्याला अटक करणे हे धाडस दाखवणं, ही त्यांच्या निडर व्यक्तिमत्त्वाची जाणीव करून देतं.
फक्त अधिकारीच नाही, मॉडेलही!
डी. रुपा या केवळ एक कणखर अधिकारीच नाहीत, तर त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. समाज माध्यमांवर त्या नेहमी सक्रीय असतात आणि त्यांच्या अनुभवांद्वारे अनेक तरुणांना प्रेरित करतात. त्यांच्या बहिणी रोहिणी दिवाकर या देखील सरकारी सेवेत असून आयकर विभागात कार्यरत आहेत.
एक आदर्श अधिकारी!
डी. रुपा यांची कहाणी हेच दर्शवते की ईमानदारी, धैर्य आणि नीतिमत्ता असेल, तर कोणत्याही परिस्थितीत यश मिळू शकतं. त्यांच्या नावाचा आजही अनेकांना दरारा वाटतो. सत्तेच्या दबावापुढे न झुकता त्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा कायम राखली आहे.