
माणदेश एक्सप्रेस न्यूज | रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कौंढर ताम्हाणे येथील एका गरीब महिलेचा लाडकी बहीण योजनेसाठी केलेला अर्ज शासनाने फेटाळला. कारण म्हणून तिच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ही महिला मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी असून तिचे स्वतःचे राहते घरसुद्धा नीट नाही. त्यामुळे अर्ज फेटाळल्याने ती महिला आक्रोशित झाली आहे.
“मी रोज मोलमजुरी करते. माझं कुटुंब कसंतरी पोटभर जेवतं. माझं घरसुद्धा अर्धवट, गळक्या छपराचं आहे. मग माझ्या नावावर चारचाकी गाडी कुठून असणार? मला खरंच मदतीची गरज आहे. पण माझाच अर्ज बाद झाला. सरकारने नीट चौकशी करून खऱ्या पात्र महिलांना मदत करावी,” अशी व्यथा या महिलेने शासनासमोर मांडली.
या प्रकरणामुळे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना अनेक गरजूंना अन्याय सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी प्रशासनाने काटेकोर तपासणी करणे आवश्यक असले तरी प्रत्यक्षात अनेकांना खोट्या कारणावरून वंचित ठेवले जात असल्याचे चित्र उभे राहत आहे.
स्थानिक नागरिकांनी देखील या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. “ज्यांना खरंच मदतीची गरज आहे त्यांना अर्ज फेटाळून वंचित ठेवले जाते. पण काहीजण राजकीय दबावामुळे सहजपणे लाभ घेतात. सरकारने तातडीने अशा प्रकरणांची चौकशी करून अन्याय झालेल्यांना न्याय द्यावा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेनंतर प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचते का, हा मोठा सवाल उपस्थित झाला आहे. गरीब, वंचित आणि खऱ्या अर्थाने गरजूंना न्याय मिळावा, यासाठी शासनाने पारदर्शक यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे.


