
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ गेल्या वर्षभरात राज्यातील लाखो महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे. दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत महिलांच्या खात्यात जमा होत असून आतापर्यंत एकूण 18 हजार रुपयांचा दिलासा प्रत्येक लाभार्थी महिलेला मिळालेला आहे. मात्र, या योजनेत गैरप्रकार घडल्याचे समोर आल्यानंतर सरकारने लाभार्थींच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. आता ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
या योजनेत काही ठिकाणी गंभीर घुसखोरी झाल्याचे सरकारच्या तपासणीत उघडकीस आले आहे. काही पुरुषांनी महिलांच्या नावावर लाभ घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले, तर काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या महिलांनीही या योजनेतून अनधिकृत लाभ घेतल्याचे लक्षात आले. याच पार्श्वभूमीवर सरकारने योजनेतील पात्र लाभार्थ्यांची खरी ओळख पटवण्यासाठी ई-केवायसी सक्तीचे केले आहे.
लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी खालील कागदपत्रं आवश्यक आहेत :
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
रहिवाशी दाखला / रेशन कार्ड / मतदान ओळखपत्र
उत्पन्नाचा दाखला
बँक खात्याची सविस्तर माहिती
शासनाने नमूद केलेली इतर कागदपत्रं
ई-केवायसी प्रक्रिया ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा ई-महासेवा केंद्रावर करता येणार आहे.
प्रक्रिया पुढीलप्रमाणे :
संकेतस्थळावर लॉग-इन करा आणि ‘ई-केवायसी’ पर्यायावर क्लिक करा.
आपले नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती व आधार क्रमांक भरा.
आवश्यक कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करा आणि सबमिट करा.
सबमिशनची खात्री करून घ्या; त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.
या योजनेतील सर्व लाभार्थींनी दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. सणासुदीचा हंगाम आणि महिलांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन सरकारने ही मुदत दिल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर महिलांना केवळ दरमहा 1500 रुपयांची मदतच नव्हे, तर 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जही घेता येणार आहे. सध्या ही योजना मुंबई शहर व उपनगरात सुरू झाली असून 3 सप्टेंबरपासून मुंबई बँकेमार्फत महिलांना कर्जपुरवठा सुरू करण्यात आला आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात ही सुविधा लागू होणार असून ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, दोन महिन्यांच्या मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महिलांचा पुढील हप्ता रोखला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी विलंब न करता तातडीने ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.