
माणदेश एक्सप्रेस न्यूज | अलिबाग :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि त्यांचा लाभ बंद झालेल्या लाभार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महिला व बालविकास विभागाने अशा महिलांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतला असून, पात्र असलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा योजना सुरू करून देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून लाभ थांबलेल्यांना मोठा आधार मिळणार आहे. रायगड जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत रुक्मिणी ज्ञानोबा हावळे यांनी याबाबत आवाहन करताना सांगितले की, “अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. पडताळणीत पात्र ठरल्यास त्यांना योजनेंतर्गत लाभ पुन्हा सुरू करण्यात येईल.”
राज्य सरकारने योजनेअंतर्गत नियमित पडताळणी सुरू केली असता, मोठ्या प्रमाणावर अपात्र महिला लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले. परिणामी, मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांचा लाभ थांबविण्यात आला.
यात प्रामुख्याने पुढील लाभार्थींचा समावेश आहे :
आधारकार्डप्रमाणे २१ वर्षांखालील किंवा ६५ वर्षांवरील महिला.
एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणाऱ्या प्रकरणांतून अपात्रता.
वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा जास्त असलेले कुटुंब.
कुटुंबातील सदस्य आयकरदाता, नियमित सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक.
महिला लाभार्थी शासनाच्या अन्य योजनेतून दरमहा ₹१५०० किंवा त्याहून अधिक आर्थिक सहाय्य घेत असलेली.
कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असल्यास.
कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत असल्यास.
महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, तात्पुरता थांबविलेला लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी अपात्र ठरलेल्या महिलांनी नव्या पडताळणीत सहकार्य करणे आवश्यक आहे. योग्य कागदपत्रांची तपासणी आणि गावपातळीवरील अंगणवाडीमार्फत माहिती संकलित करून विभाग याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.
राज्यात मोठ्या संख्येने महिला या योजनेवर अवलंबून आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अचानक लाभ थांबवल्याने अनेक कुटुंबात नाराजी निर्माण झाली होती. मात्र, सरकारने फेरपडताळणी करून पात्र महिलांना पुन्हा लाभ सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ज्या महिलांचा माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ बंद झाला आहे, त्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी तातडीने संपर्क साधून कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने केले आहे.