
माणदेश एक्सप्रेस न्युज | पुणे :
राज्यातील महिलांसाठी राबविण्यात आलेल्या ‘लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) संदर्भात एक धक्कादायक आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या योजनेत तब्बल २६ लाख महिलांची नावे यादीतून गायब झाली असून, सुमारे ४,९०० कोटी रुपयांचा महाभ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सरकारच्या अधिकृत आकडेवारीवरूनच हे स्पष्ट होतं की ही योजना पारदर्शकपणे राबवली जात नाही. पात्र बहिणींची नावे वगळण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेलं नाव कमी करणं हे केवळ प्रशासनिक चूक नसून, यामागे गंभीर भ्रष्टाचार आहे. पैसे पुरुषांच्या खात्यावर गेले असे सांगण्यात येतं, पण हे पैसे नेमके गेले कुठे, याचं उत्तर सरकारने द्यायलाच हवं.”
याचवेळी, सुळे यांनी जीएसटी (GST) बाबत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “आज जीएसटीचा उत्सव साजरा केला जात आहे. पण हा निर्णय जर पाच वर्षांपूर्वी घेतला असता तर आज वेगळं चित्र दिसलं असतं. माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आधीच या धोरणातील चुका दाखवून दिल्या होत्या. उशिरा का होईना, आता सुधारणा केली आहे म्हणून सरकारचे आभार, पण जनतेवर पाच वर्षे अन्याय झाला,” असे त्या म्हणाल्या.
एका शिवसेना नेत्याने केलेल्या “आमदार नसतानाही २० कोटी निधी मिळतो” या दाव्यावरूनही सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं. “जर खरोखरच असे प्रकार घडत असतील तर महाराष्ट्र सरकारने त्याचं उत्तर द्यायलाच हवं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःला ‘प्रधान सेवक’ म्हटलं होतं. पण इथं त्यांच्या शब्दांनाही सरकार किंमत देत नाही, असं चित्र निर्माण झालं आहे,” अशी टीका त्यांनी केली.
सुळे यांनी या घोटाळ्याशी संबंधित वक्तव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. “महिलांना दिलेला निधी कुठे जातोय? २६ लाख बहिणींची नावे गायब करणं ही सामान्य चूक नसून, हेतुपुरस्सर कारस्थान आहे. यातूनच सरकारचं महिलांविषयीचं असंवेदनशील धोरण दिसून येतं,” असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील लाखो महिलांना थेट प्रभावित करणारा हा मुद्दा उचलून धरत, सुप्रिया सुळे यांनी सरकारकडून पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. “४,९०० कोटींचा हिशेब द्यायलाच हवा. अन्यथा हा महिलांच्या हक्कांवर केलेला सर्वात मोठा घोटाळा मानला जाईल,” असे त्या ठामपणे म्हणाल्या.