
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी शासनाने नव्या योजनेला मंजुरी दिली असून, त्यानुसार आता महिलांना त्यांच्या छोट्या-मोठ्या व्यवसायासाठी १ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे.
या योजनेचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि उद्योजकतेला चालना देणे हा आहे. कर्ज घेताना परतफेडीचा बोजा महिलांवर पडू नये यासाठी शासनाने विशेष सोय केली आहे. योजनेनुसार, लाभार्थींना मिळणाऱ्या १,५०० रुपयांच्या मासिक मानधनातून कर्जाचा हप्ता थेट वळते केला जाणार आहे. त्यामुळे कर्जफेडीची झंझट महिलांना भासणार नाही.
राज्यातील हजारो महिला सध्या लाडकी बहिण योजना अंतर्गत मानधन घेत आहेत. अनेक महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा व्यक्त करत असल्या तरी भांडवलाच्या अभावामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या नवीन कर्जयोजनेमुळे त्यांना उद्योजकतेसाठी आवश्यक निधी सहज उपलब्ध होईल.
शासनाकडून देण्यात येणाऱ्या या कर्जाचा वापर करून महिला शेतीपूरक व्यवसाय, किराणा दुकान, शिवणकाम, लघुउद्योग, डेअरी व्यवसाय, हस्तकला उद्योग, तसेच विविध सेवा क्षेत्रात नवे उपक्रम सुरू करू शकतील.
ग्रामीण भागात महिलांकडे असलेली कामकाजाची क्षमता आणि उद्योजकतेची वृत्ती यांना या कर्जातून नवा आधार मिळेल. यामुळे केवळ महिलांचे आत्मसक्षमीकरण होणार नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल.
कर्जफेडीबाबत महिलांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारने अभिनव पद्धत राबवली आहे. लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या मानधनातून प्रत्येक महिन्याला निश्चित रक्कम थेट वळते केली जाईल. त्यामुळे वेळेवर हप्ते भरले जातील आणि महिला कर्जाच्या ताणापासून मुक्त राहतील.
शासनाला विश्वास आहे की या योजनेमुळे हजारो महिला छोटे उद्योग सुरू करून आपले कुटुंब सक्षम करतील. तसेच, महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील आणि “स्त्री सशक्तीकरण” या संकल्पनेला खरी दिशा मिळेल.