
माणदेश एक्सप्रेस न्युज | लडाख :
लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीत समावेश मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन बुधवारी उग्र झालं. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाने काल हिंसक वळण घेतलं. आंदोलनकर्त्यांनी लेहमधील भाजप कार्यालयाला तसेच सीआरपीएफच्या वाहनाला आग लावली, तर हिल काउन्सील इमारतीवरही जोरदार दगडफेक करण्यात आली.
हवामान बदल, जमीन आणि स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी दीर्घकाळ लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गेल्या १५ दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचबरोबर दोन महिला आंदोलनकर्त्यांची तब्येतही बिघडल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. यामुळे आंदोलन अधिक आक्रमक झालं.
आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.
संतप्त आंदोलकांनी भाजप कार्यालय पेटवलं.
सीआरपीएफचं वाहन जाळलं.
हिल काउन्सील इमारतीवर दगडफेक.
परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात.
लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा.
लडाखचा सहाव्या अनुसूचीत समावेश करावा, ज्यामुळे आदिवासी दर्जा आणि हक्कांची हमी मिळेल.
स्थानिक जनतेच्या जमीन, संसाधनं व पर्यावरण संरक्षणासाठी कायदेशीर हमी.
हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयानं तातडीने दखल घेतली आहे. लडाखमधील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू करण्यात आली आहे. पुढील महत्त्वाची बैठक ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये होणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.
मात्र आंदोलकांचा ठाम पवित्रा आहे की, त्यापूर्वीच या प्रश्नावर ठोस तोडगा काढावा. “लोकांच्या मागण्यांकडे केवळ बैठकांच्या तारखांनी बघू नका, आमच्या हक्कासाठी त्वरित निर्णय घ्या,” असं आंदोलन आयोजकांनी स्पष्ट केलं आहे.
लेहमध्ये काल दिवसभर तणावपूर्ण वातावरण होतं. आगजनी, दगडफेक आणि झटापटीनंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
लडाखच्या संघर्षाला आता देशभरातले युवक, विशेषतः Gen Z पिढीचा आक्रमक सहभाग मिळत असल्याने या आंदोलनाचं स्वरूप अधिक व्यापक आणि आक्रमक होत असल्याचं स्पष्ट होत आहे.