मावशीच्या एका शब्दाने पेटला मामा, ३ वर्षांच्या मुलाचा निर्दयी बळी

0
154

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
“युसलेस” हा मावशीने केलेला टोमणा तरुणाला एवढा जिव्हारी लागला की त्याने मावशीच्या तीन वर्षीय मुलाचा निर्घृण खून करून मृतदेह रेल्वेच्या टॉयलेटमधील फ्लश टँकमध्ये लपवला. संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या या घटनेतील आरोपी विकासकुमार शाह (३०) याला अखेर मुंबईतील बीकेसी परिसरातून पोलिसांनी अटक केली. सुरत क्राइम ब्रँच आणि अमरोळी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला जेरबंद केले.


मिळालेल्या माहितीनुसार, विकासकुमार शाह दुबईत नोकरी करत होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली आणि तो भारतात परतला. त्यानंतर तो सुरतमधील अमरोळी भागात आपल्या मावशी दुर्गावती व तिचा पती राजेंद्र यांच्याकडे राहायला गेला. बेरोजगारीमुळे त्याला वारंवार टोमणे ऐकावे लागत होते. त्याची मावशी त्याला वारंवार “युसलेस” असे म्हणत होती. यामुळे विकासच्या मनात राग साचत गेला.


घटनेच्या दिवशी, २१ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता, विकासने आपल्या मावशीच्या तीन वर्षांच्या मुलाला, आकाश उर्फ आरव, याला “खेळायला चल” असे सांगून बाहेर नेले. त्याने थेट मुंबईकडे जाणारी कुशीनगर एक्स्प्रेस पकडली.

ट्रेनमध्ये एसी डब्याच्या टॉयलेटमध्ये जाऊन त्याने आधी मुलाचा गळा आवळला आणि नंतर चाकूने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर मृतदेह टॉयलेटमधील फ्लश टँकमध्ये कोंबून तो पसार झाला.


या कृत्याबद्दल विकासला अजिबात पश्चात्ताप नाही, असे पोलिसांनी सांगितले. केवळ “युसलेस” म्हटल्याच्या रागातून त्याने एवढ्या लहान मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली आहे.


हत्या झाल्यानंतर विकास फरार होता. पोलिसांनी त्याचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन याचा वापर केला. तो दररोज फक्त थोड्या वेळासाठी फोन सुरू करत असल्याने शोध घेणे कठीण झाले होते.
तपासात समजले की, तो वांद्रे, दादर आणि कुर्ला या भागात फिरत होता. त्याने बीकेसीमध्ये नवीन नोकरी मिळवली होती.


२५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी त्याचा फोन सुरू झाल्याचे पोलिसांना आढळले. त्याचे लोकेशन बीकेसी परिसरात मिळाल्यानंतर पोलिसांनी गुप्तपणे त्याच्यावर नजर ठेवली. तो बसने बांद्रा स्टेशनकडे जात असताना गर्दीत पोलिसांनी त्याला अटक केली.


मावशीच्या एका कटू शब्दावर एवढा निर्दय सूड उगवून तीन वर्षांच्या निरागस मुलाचे प्राण घेणाऱ्या या घटनेने समाज हादरला आहे. एका क्षणिक रागातून एवढे भीषण पाऊल उचलले गेले यावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here