“बलिदान व्यर्थ नाही! अखेर मराठा बांधवांना मिळाली कुणबी ओळख” ; आंदोलनकर्त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

0
307

माणदेश एक्सप्रेस न्युज | बीड

मराठा आरक्षणासाठी गेले कित्येक महिने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अनेकांनी प्राणांचं बलिदान दिलं, अनेक घरं उद्ध्वस्त झाली. मात्र आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण, राज्य सरकारने काढलेल्या 2 सप्टेंबर 2025 च्या महत्त्वाच्या जीआरनंतर अखेर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झालं आहे. बीड, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांत प्रमाणपत्रे देण्यात आली असून, हा क्षण पाहताना अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.


मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पहिलं कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. बीड येथील कार्यक्रमात पाच मराठा बांधवांना प्रमाणपत्रं देण्यात आली. प्रमाणपत्र हातात येताच काहींच्या डोळ्यांत आसवं तरळली. आंदोलनाचं फलित अखेर मिळाल्याचा दिलासा यावेळी सर्वत्र व्यक्त होताना दिसला.


धाराशिव जिल्ह्यातील कार्यक्रमालाही विशेष महत्त्व होतं. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते एकूण चार मराठा बांधवांना प्रमाणपत्रं देण्यात आली. यामध्ये मुंडे अभिषेक व्यंकटेश, प्रगती व्यंकटेश मुंडे, पूजा व्यंकटेश मुंडे आणि गणेश व्यंकटेश मुंडे (सर्व धाराशिव निवासी) यांचा समावेश आहे.
मराठवाड्यात धाराशिवमध्ये पहिल्यांदाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याने हा सोहळा ऐतिहासिक ठरला.


हिंगोली जिल्ह्यात देखील आज मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आलं. पालकमंत्री नरहरि झिरवळ यांच्या हस्ते तब्बल 50 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रं देण्यात आली. यामध्ये हैदराबाद गॅजेटरमध्ये नोंदी असलेल्या मराठा बांधवांना ही प्रमाणपत्रं देण्यात आली आहेत.


वाटप करण्यात आलेल्या सर्व प्रमाणपत्रांवर स्पष्टपणे ‘कुणबी’ असा उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रधारकांना दिली. सरकारच्या जीआरच्या अधारे प्रमाणपत्रं देण्यात येत असून, आता राज्यातील ठिकठिकाणी असे सोहळे सुरू झाले आहेत.


या वाटपानंतर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही आपली भूमिका मांडली.
“मराठवाडा मुक्ती मिळाली, पण खरी मुक्ती मराठ्यांना मिळाली पाहिजे. आज जे कुणबी प्रमाणपत्रं वाटप होणार आहेत त्यांचं परीक्षण मी स्वतः अंतरवाली सराटीला करणार आहे. सरकारने नेमकं कोणत्या आधारावर प्रमाणपत्रं दिली हे बघायला हवं. जर सरकारनं 84 च्या जीआरचा आधार घेतला असेल, तर मग आरक्षणाच्या इतर बाबतीत वेगळे नियम का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यासोबतच त्यांनी पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीबाबत सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली. तसेच –
“जर आरक्षणाबाबत सरकारनं मागेपुढे केलं, तर दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाईलनं आंदोलन होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.


आज झालेल्या या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या बलिदानाला योग्य न्याय मिळाल्याची भावना सर्वत्र आहे. गेल्या काही महिन्यांत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या बलिदानाचं चीज झाल्याचं अनेक मराठा बांधवांचे डोळे सांगत होते.


कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपानं मराठा आरक्षणाच्या लढ्याला एक वेगळं वळण मिळालं आहे. परंतु अजूनही संपूर्ण मराठा समाजाच्या समाधानासाठी अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. आता येणाऱ्या काळात सरकार आणि आंदोलनकर्ते यांचा पुढचा पवित्रा काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here