
माणदेश एक्सप्रेस न्युज | नाशिक :
प्रयागराजनंतर २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा ही केवळ धार्मिक नव्हे, तर रोजगारनिर्मितीची मोठी पर्वणी ठरणार आहे. देश-विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने शहर व परिसरात हजारो कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांच्या प्रचंड व्याप्तीमुळे हजारोंच्या संख्येने अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली असून, बेरोजगार तरुणांसाठी ही एक मोठी संधी उभी राहणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व विभागांना रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. कुंभमेळ्याशी संबंधित सुमारे ३० हून अधिक विभाग या कामात सहभागी असणार आहेत. यामध्ये नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद, नाशिक शहर व ग्रामीण पोलीस, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग (नाशिक व अहिल्यानगर), भारतीय राज्यमार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आरोग्य सेवा, पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन विभाग, राज्य पुरातत्व विभाग, त्र्यंबकेश्वर नगरपालिका आदींचा समावेश आहे.
डॉ. गेडाम यांनी सूचित केले आहे की, रिक्त जागा भरताना विहित प्रक्रिया काटेकोरपणे पाळावी. ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत नियुक्तीची जबाबदारी आहे त्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करून पदभरती करावी. जर नियुक्ती शक्य नसेल, तर आवश्यक मनुष्यबळाची मागणी, उपलब्ध क्षमतेचा अहवाल व कार्यालय प्रमुखांचा अभिप्राय सादर करावा.
प्राधिकरणाला नाशिक विभागातील कोणत्याही शासकीय विभाग, स्थानिक प्राधिकरण, मंडळे, महामंडळे यांचे मनुष्यबळ पूर्णवेळ अथवा अर्धवेळ अधिग्रहीत करून वापरण्याचे अधिकार आहेत. तसेच, गरज पडल्यास नाशिक विभागाबाहेरील मनुष्यबळ शासनाच्या पूर्वपरवानगीने वापरण्याचा अधिकारही प्राधिकरणाकडे आहे.
मनुष्यबळाअभावी कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी विभागांनी वेळीच आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, अशी कडक सूचना प्राधिकरणाने केली आहे. मनुष्यबळाची कमतरता ही कामाच्या विलंबाची सबब म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असे आदेशही डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले आहेत.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक मेळा नसून, तो रोजगारनिर्मितीचा प्रचंड स्त्रोत ठरणार आहे. प्रशासनिक, सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता, पर्यटन, वाहतूक, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये तात्पुरते तसेच काही ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार निर्माण होणार आहेत. हजारो बेरोजगार तरुणांसाठी या माध्यमातून संधीचे नवीन दरवाजे खुलणार आहेत.
कुंभमेळा २०२७ हा नाशिकच्या विकासासाठी टर्निंग पॉईंट ठरणार असून, बेरोजगारांसाठी “नोकरी मेळा” ठरण्याची चिन्हे आहेत.