
कोयना आणि चांदोली धरणात लक्षणीय वाढ
माणदेश एक्सप्रेस न्युज|सांगली– जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बोरगाव व सांगलीचा बंधारा पाण्याखाली गेला असून, आयर्विन पुलाजवळ नदीची पातळी रविवारी १५ फूटांवर पोहोचली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नदीपात्रात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोयना आणि चांदोली धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे दोन्ही धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना परिसरात ४२ मिमी आणि चांदोली परिसरात ४० मिमी पावसाची नोंद झाली. कोयना धरणात २४.३१ टीएमसी म्हणजेच २३% पाणीसाठा झाला असून, चांदोली धरणात १३.४७ टीएमसी म्हणजे ३९% पाणीसाठा नोंदवला गेला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जोर धरला असून, पश्चिमेकडून आलेल्या पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. येरळा नदीला पूर आला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष, भाजीपाला यांसारख्या नगदी पिकांना बसला आहे. मात्र, ऊस पिकासाठी हा पाऊस वरदान ठरत असून, बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
तथापि, शिराळा तालुक्यात रोहिणी नक्षत्रावर होणारी धुळवाफेवरील भात पेरणी यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे खरीप पेरणीच्या नियोजनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जलसंपदा विभागही धरणातील विसर्गावर सतत नजर ठेवून आहे.