
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आटपाडी/प्रतिनिधी :
आटपाडी तालुक्यातील कौठुळी गावातील गणेश कदम या तरुणाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली होती. आज त्याच्या माती सावडण्याचा दिवस होता. परंतु त्याआधीच काल (शनिवारी) मध्यरात्री गावातील स्मशानभूमीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गणेशच्या प्रेताजवळ अघोरी विद्येचा संशय येईल असे साहित्य, तसेच चिठ्ठ्यांमध्ये काही लोकांची नावे लिहिलेली आढळून आली. या घटनेमुळे संपूर्ण कौठुळी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
घटना कशी उघडकीस आली?
गावातील नागरिक आज सकाळी स्मशानभूमी परिसरात माती सावडण्याचा गेले असता त्यांना गणेशला अग्नी दिली त्या ठिकाणी जळणाऱ्या अगरबत्त्या, हळद-कुंकू, लिंबू, कवाळ, कुंकू-हळद लावलेले नारळ तसेच विचित्र आकारातील आकृत्या काढून ठेवलेले साहित्य दिसले. त्याचबरोबर एका चिठ्ठीवर काही लोकांची नावे लिहून ठेवण्यात आली होती. हे सर्व पाहताच गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले. काही वेळातच ही माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि गावभर चर्चा सुरू झाली.
संशयित हेतूवर चर्चा
गणेश कदमच्या आत्महत्येनंतर गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्याच. परंतु आता स्मशानभूमीतील या प्रकारामुळे वातावरण आणखीनच गंभीर झाले आहे. ही अघोरी कृती कोणत्या हेतूने करण्यात आली, नेमके कोणती नावे लिहिली गेली, त्यामागे सूडभावना आहे की अंधश्रद्धेचा प्रभाव, याबाबत विविध अंदाज व्यक्त होत आहेत.
गावात भीतीचे वातावरण
या प्रकारामुळे गावकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मरणोत्तर विधींच्या काळात अशा प्रकारे अघोरी विद्येचा प्रयोग केल्याने संतापही व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी पोलिसांनी कठोर कारवाई करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी केली आहे.