कोल्हापूरच्या नेमबाजीपटूचा आंतरराष्ट्रीय मंचावर दणका; भारतासाठी अभिमानाचा क्षण

0
64

माणदेश एक्सप्रेस न्युज|कोल्हापूर– कोल्हापूरच्या शांभवी श्रावण क्षीरसागर हिने जर्मनीतील सुहल येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत संपूर्ण देशाचे नाव उज्वल केले आहे. आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप २०२५ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात ६३३.१ गुणांसह सर्वोत्तम कामगिरी करत तिने हे यश संपादन केले.

 

शांभवीने स्पर्धेच्या सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि भारताच्या ओजस्वी ठाकूरसारख्या सक्षम प्रतिस्पर्ध्याला मागे टाकत विजेतेपद आपल्याकडे खेचले. ओजस्वी ठाकूरने या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. चीनच्या ली शिजिया आणि हुआंग युटिंग, तसेच इटलीच्या कार्लोटा सालाफिया यांनीही आघाडी गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र शांभवीने अचूक नेमबाजी करत सर्वांवर मात केली.

 

या स्पर्धेतील यशामुळे भारताने एकूण ८ पदकांसह (२ सुवर्ण, ३ रौप्य, ३ कांस्य) गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. याआधी दिवसभरात नरन प्रणव वनीता सुरेश आणि मुकेश नेलवल्ली यांनी अनुक्रमे १० मीटर एअर रायफल आणि २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कांस्यपदके जिंकली.

 

शांभवी कोल्हापूरमधील सक्सेस शूटिंग अकादमीत सराव करते. तिच्या यशामागे तिचे पालक श्रावण आणि अर्चना क्षीरसागर यांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक संतोष जाधव यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. शांभवीच्या यशाबद्दल देशभरातून तिचे अभिनंदन होत आहे.

 

तिने आपल्या मेहनतीने कोल्हापूरसह महाराष्ट्र व भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. हे सुवर्ण यश तिच्या अथक मेहनतीचे फळ असून, ती येत्या काळात भारतीय नेमबाजी क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here