कृषीहंगामासाठी दिलासा; “या” जिल्ह्यात आठवडाभर पावसाचा अंदाज

0
166

माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाला काहीशी विश्रांती मिळाली होती. मात्र आता पुन्हा मान्सून वारे सक्रिय होत असून जिल्ह्यात पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार, दि. १३ सप्टेंबरपासून गुरुवार, दि. १८ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

मान्सून वारे पुन्हा सक्रिय

दक्षिण ओरिसा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीदरम्यान सुमारे ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच मान्सून आसाचे पश्चिमेकडील टोक दक्षिणेकडे गुजरातपर्यंत सरकल्यामुळे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेचा प्रभाव वाढला आहे. याचाच परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले असून शनिवारपासून पावसाची सुरुवात होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

सातारा-सांगलीतही पावसाची शक्यता

दरम्यान, शेजारील सातारा आणि सांगली जिल्ह्यातही पुढील सोमवार, दि. १५ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. मात्र त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे, असे खुळे यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील धरणसाठा (टीएमसीत, कंसात पावसाचे प्रमाण मि.मी.)

  • राधानगरी – ८.०९ (०)

  • तुळशी – ३.४७ (०)

  • वारणा – ३३.७४ (०)

  • दूधगंगा – २१.२९ (०)

  • कासारी – २.६४ (०)

  • कडवी – २.५२ (०)

  • कुंभी – २.६५ (१०)

  • पाटगाव – ३.६७ (०)

शेतकरी आणि नागरिकांसाठी सूचना

सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या देखभालीसाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी सूचना तज्ज्ञांनी दिली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनीही नद्या-ओढ्याच्या पाणलोट क्षेत्रात सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

👉 कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही पावसाची मालिक महत्त्वाची ठरणार असून धरणसाठा वाढण्याबरोबरच खरीप हंगामासाठीही हा पाऊस उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here