
माणदेश एक्सप्रेस न्युज | कोल्हापूर :
करवीर प्रांताधिकाऱ्यांचा आदेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका वकिलाने तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी वकील विनायक सुरेश तेजम (वय ३७, रा. मंजुळा अपार्टमेंट, शाहूपुरी, कोल्हापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी (दि. २५) सायंकाळी रंगेहात पकडले. शाहूपुरीतील महालक्ष्मी चेंबर येथे त्याच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदारांच्या कोल्हापुरातील मिळकतीवरील ‘ब सत्ता प्रकार’ बदलण्यासाठी करवीर प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला होता. हे काम करून देण्याचे आश्वासन देत ॲड. तेजम याने तक्रारदारांकडून आधीच १ लाख ६५ हजार रुपये घेतले. मात्र, काम पुढे नेण्यासाठी आणि प्रांताधिकाऱ्यांना देण्यासाठी अजून १ लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात आले.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पडताळणीनंतर गुरुवारी सापळा रचण्यात आला. त्यावेळी ॲड. तेजम हा २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडला.
या प्रकरणी प्रांत कार्यालयातून पैशांची मागणी झाली होती काय, याची चौकशी करण्यात आली. परंतु प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयातून कोणतीही मागणी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत “कामाचे शुल्क म्हणून आधी घेतलेली रक्कम व त्यानंतरची पैशांची मागणी ही पूर्णतः वकिलाने स्वतःच्या नावावर केली होती. प्रांत कार्यालयाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही,” असे उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ॲड. तेजम याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.