दुर्दैवी घटना : १० वर्षांच्या श्रावणचा आईच्या मांडीवरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
344

माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोल्हापूर :
गणेशोत्सवाच्या आनंदमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील १० वर्षीय श्रावण गावडे या चिमुकल्याचा खेळता खेळता अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आईच्या मांडीवर डोकं ठेवून तो कायमचा शांत झोपला. या घटनेने संपूर्ण गाव हळहळून गेलं आहे.


गणेशोत्सवाच्या तयारीत आणि उत्साहात कोडोली गाव दंग होतं. गावातील गणेश मंडळात मुलं श्रावण खेळत होती. त्यांच्यात श्रावण गावडेही सामील होता. मस्ती, धमाल करत खेळ सुरू असतानाच अचानक श्रावणला अस्वस्थ वाटू लागलं. थकवा आल्यामुळे तो खेळ सोडून आपल्या आईकडे गेला.


श्रावण आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसला. पण क्षणातच अनर्थ घडला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने श्रावणची हालचाल थांबली. काही कळण्याआधीच चिमुकल्या श्रावणचा प्राण पंखा पसरून उडून गेला. आईला काय झालंय हे समजताच तिने हंबरडा फोडला. तिचा आक्रोश ऐकून गावकरी धावत आले.


गावकऱ्यांच्या मदतीने तात्काळ श्रावणला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून तो आधीच मृत झाल्याचं स्पष्ट केलं. ही बातमी कळताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं. नुकताच गणेशोत्सव सुरू झाला होता, पण गावात अचानक दुःखाचे वातावरण पसरले.


श्रावण गावडेच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यापूर्वीच चार वर्षांपूर्वी श्रावणच्या बहिणीचं निधन झालं होतं. आता घरचा एकुलता एक मुलगाही सोडून गेल्याने गावडे कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. आपल्या डोळ्यासमोर मंडपात उड्या मारत खेळणारा श्रावण अचानक कायमचा दूर गेल्याने नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत.


“अजून काही दिवसांत गणपतीचे आगमन होणार होतं. मुलं खेळत होती, वातावरण आनंदमय होतं. पण या घटनेने सर्वांचा उत्साह संपलाय. एवढ्या लहान वयात मुलगा हृदयविकाराने जाणं, हे कुणालाच पचवता येत नाही,” अशी हळहळ गावकरी व्यक्त करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here