
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | कोल्हापूर :
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर होऊन आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा मध्यरात्री घरात घुसून तलवार, एडका, फायटर आणि लोखंडी पाईपने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोड परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ माजली असून गुन्हेगारांविरोधात करवीर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मृत तरुणाचे नाव महेश राजेंद्र राख (वय २३, रा. अहिल्याबाई होळकर नगर, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) असे आहे. करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांपैकी आदित्य शशिकांत गवळी याची पत्नी महेश राख याने फूस लावून पळवून नेली होती. या कारणावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.
शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आदित्य गवळी, त्याचा भाऊ सिद्धांत गवळी यांच्यासह धीरज शर्मा, ऋषभ साळोखे-मगर, मयूर कांबळे, पियुष पाटील, सद्दाम कुंडले आणि एका अनोळखी साथीदाराने मिळून महेश राख यांच्या घरावर हल्ला चढवला.
सुरुवातीला घरावर दगडफेक आणि बियरच्या बाटल्या फेकून दहशत निर्माण केली. त्यानंतर सर्व आरोपी घरात घुसले आणि तलवार, फायटर, एडका व लोखंडी पाईपने महेशवर तुफान हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत महेशला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात सर्व आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये काहींचा सराईत गुन्हेगारांमध्ये समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्यासह करवीर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध सुरू असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
घटनेनंतर फुलेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मध्यरात्री झालेल्या हल्ल्यानंतर दगडफेक व बियर बाटल्यांमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.