
माणदेश एक्सप्रेस न्युज | कोल्हापूर :
कोल्हापूर शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलांकडून उघडपणे कोयते, एडक्यांसह धारदार शस्त्रे नाचवत दहशत माजवण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. या टोळ्यांकडून दुकानदारांकडे खंडणी मागणे, व्यवसायांवर दहशत निर्माण करणे, नागरिकांना धमकावणे आणि विरोध केल्यास मारहाण, दगडफेक व तोडफोड केली जात आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांवरही खुलेआम दगडफेक करण्याची हिंमत दाखवली जात आहे. त्यामुळे या टोळ्यांना एवढे बळ कुठून मिळते, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
गेल्या आठवड्यात फुलेवाडी येथील बेकरीत चौघांनी घुसून कोयत्याच्या धाकावर तोडफोड केली व चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. याच धाटणीची दुसरी घटना उजळाईवाडी येथील बेकरीत घडली. या हल्ल्यात दोन अल्पवयीन सहभागी होते. घटनेनंतर या टोळीने स्थानिक कॉलनीत दहशत माजवत वाहनांची तोडफोड व घरांवर दगडफेक केली. “आमचे कोणी काही करू शकत नाही,” असे आव्हान देत त्यांनी पुन्हा तोडफोड करण्याची धमकी दिली.
दोन दिवसांपूर्वी शाहूनगर चौकात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणातही चार अल्पवयीनांचा समावेश होता. या सलग घटनांनी अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे झुकाव किती धोकादायक पातळीवर गेला आहे, हे अधोरेखित केले आहे.
गांजा, ड्रग्ज आणि दारूच्या आहारी गेलेले तरुण दिवसाढवळ्या शस्त्रे नाचवत आहेत. अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट मुळापासून उद्ध्वस्त न झाल्याने गुन्हेगारीचा धोका वाढला आहे. पालकांकडून मुलांकडे दुर्लक्ष होणे हे देखील गुन्हेगारीला खतपाणी घालणारे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे.
सोशल मीडियावर काही सराईत गुन्हेगार व अवैध व्यावसायिक स्वत:चे प्रमोशन करतात. यामुळे १४ ते १८ वयोगटातील मुलं त्यांना ‘आयडॉल’ समजून गुन्हेगारीत उडी घेत आहेत. त्यांच्या नक्कल करून स्वत:ची टोळी तयार करण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.
उजळाईवाडीतील घटनेनंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. शिवाय, काही गुन्हेगार सोशल मीडियावरून पोलिसांनाच खुले आव्हान देत आहेत. त्यामुळे “पोलिसी खाक्या राहिला आहे का?” असा सवाल नागरिक करत आहेत.
गुन्हेगारी टोळ्यांकडून वाढत्या दहशतीवर लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी ठोस भूमिका घेणे नागरिकांना अपेक्षित आहे. मात्र, कोणीही उघडपणे गुन्हेगारांविरोधात बोलत नाही. उलट काही नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकांवर गुन्हेगारांचे फोटो झळकत असल्याचे दिसून येते. यातून गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याची भावना नागरिकांत आहे.
अल्पवयीन टोळ्यांच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे समाजातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी प्रभावी कारवाईसह अमली पदार्थांच्या रॅकेटवर गंडांतर आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे, समाजाने गुन्हेगारांना आयडॉल न मानता तिरस्कार करणे आणि नेत्यांनी मौन सोडून ठोस भूमिका घेणे ही काळाची गरज आहे.