पडळकर समर्थकाचे अपहरण; पाच तासांत आरोपी जेरबंद, रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा पडळकरांचा आरोप

0
138

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे :-
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वैमनस्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ स्मारक समितीचे सदस्य आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे निष्ठावान समर्थक शरणू हंडे यांचे अक्कलकोट रोडवरील साईनगर येथे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास अपहरण करण्यात आले. घरासमोरच मारहाण करत त्यांना कारमध्ये बसवून अज्ञात स्थळी नेण्यात आले. पोलिसांनी केवळ पाच तासांत कर्नाटकातील झळकी येथून आरोपींना ताब्यात घेतले.

या घटनेत आरोपी अमित म्हाळप्पा सुरवसे, सुनील भीमाशंकर पुजारी, दीपक जयराम मेश्राम आणि अभिषेक गणेश माने यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

आमदार पडळकर यांनी शुक्रवारी शरणू हंडे यांची भेट घेतली आणि या घटनेमागे करमाळा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा गंभीर आरोप केला. “२०२१ साली माझ्या गाडीवर अमित सुरवसे याने मोठा दगड फेकला होता. गुरुवारी त्याने शरणू हंडे याला अमानुषपणे मारण्याचा कट रचला होता. अपहरणानंतर गाडीत असतानाच अमितने व्हिडीओ कॉल केला आणि शरणूला माफी मागण्यास सांगितले. मात्र शरणूने नकार दिला. हा कॉल रोहित पवार यांना करण्यात आला,” असा दावा पडळकरांनी केला.

या प्रकरणामुळे सोलापूर-पुणे राजकारणात खळबळ उडाली असून पुढील चौकशीदरम्यान या अपहरणामागील खरा मास्टरमाइंड कोण याचा तपास पोलिस करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here