
माणदेश एक्सप्रेस न्युज | सावनेर :
खापरखेडा (ता. सावनेर) येथे घडलेल्या एका थरारक गुन्ह्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. पाच लाख रुपयांसाठी ब्लॅकमेलिंग करण्याच्या उद्देशाने तिघांनीच ११ वर्षीय मुलाचे अपहरण केले. मात्र, कट फसताच कारमध्येच त्याचा गळा आवळून खून करून मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकून देण्यात आला. धक्कादायक म्हणजे, हे तिघेही मुलाच्या वडिलांचे जवळचे मित्रच आहेत. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत या घटनेचा तपास लावून आरोपींना अटक केली आहे.
जितू युवराज सोनेकर (वय ११, रा. वॉर्ड क्र. २, खापरखेडा) हा सहावीत शिकणारा विद्यार्थी सोमवारी (दि. १५) शाळेतून घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय हैराण झाले. शोधाशोध करूनही तो न सापडल्याने पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. दोन दिवसांनी बुधवारी (दि. १७) सकाळी चनकापूर शिवारातील वेकोलि कॉलनीलगत झुडपात त्याचा मृतदेह बकऱ्या चारणाऱ्याला आढळून आला. शरीरावर जखमा व रक्तस्त्राव असल्याने ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
जितू हा नेहमी शाळेतून बसने यायचा; मात्र सोमवारी तो पायी निघाल्याचे मित्रांनी सांगितले. त्याचवेळी तो पांढऱ्या कारमध्ये बसून गेला होता. ही माहिती मिळताच जितूची आई संशयाने राहुल पाळचे नाव घेतले. कारण तो मुलाच्या वडिलांचा जवळचा मित्र होता आणि जितू त्याला चांगले ओळखायचा. शिवाय, तोच मुलाच्या शोधासाठी कुटुंबीयांसोबत फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व आपल्या दोन साथीदारांची नावे सांगितली.
जितूचे आई-वडील वेगवेगळे राहत असले तरी त्याचे वडील चनकापूर येथे राहतात. वडील भाजीपाला विकतात, मात्र त्यांची पांढुर्णा (म. प्र.) येथे शेती असून त्यातून त्यांना मोठी रक्कम मिळणार असल्याची माहिती राहुलला होती. त्यामुळे जितूचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून पाच लाख रुपये वसूल करण्याचा कट रचण्यात आला. राहुल पाल, यश वर्मा आणि अरुण भारती (तिघेही रा. चनकापूर) यांनी सोमवारी कार (एमएच ४०-ए ७२२७) घेऊन जितूचे अपहरण केले.
आरोपींनी जितूला खापरखेडा परिसरातून अण्णामोड, कोराडी मंदिर रोड, भानेगाव मार्गे पारशिवनीच्या दिशेने नेले आणि नंतर पुन्हा चनकापूरकडे आणले. रात्री ११ ते १२ च्या सुमारास एबी इन्कलाइल कोळसा खाण मार्गावर कारमध्येच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. मृतदेह त्यांनी पोत्यात भरून सुरुवातीला वेकोलिच्या चनकापूर येथील एका कब्जा केलेल्या क्वॉर्टरमध्ये ठेवला. मात्र, दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी मृतदेह झुडपात फेकला आणि पोते रेतीच्या ढिगाऱ्यात दडवले.
खापरखेडा पोलिसांनी आरोपींकडून वापरलेली कार, मृतदेह ठेवलेले क्वॉर्टर, शाळेची बॅग तसेच रेतीच्या ढिगाऱ्यातील पोते जप्त केले आहे. ठाणेदार हरीश रुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली खापरखेडा पोलिस व झोन-५ गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलाच्या हत्येची ही घटना समजताच खापरखेडा व परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पैशाच्या हव्यासापोटी इतक्या निर्घृण पद्धतीने मित्रानेच मित्राचा विश्वासघात करून मुलाचा जीव घेतल्याने समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.