
माणदेश एक्सप्रेस न्युज | मध्य प्रदेश –
२१ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पदम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रिस गावात घडलेली घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली. एका महिलेला मध्यरात्री निर्दयीपणे ४० ते ४५ वेळा चाकूने वार करून ठार करण्यात आलं. सुरुवातीला हा प्रकार दरोडा आणि लुटमारीचा असल्याचं भासवलं गेलं. मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतस पोलिसांसमोर एक भयंकर सत्य आलं. महिलेच्या खुनामागे तिच्याच पतीचा हात असल्याचं समोर आलं. त्यानेच पत्नीला मारण्यासाठी मित्रांना सुपारी दिली होती.
रविवारी मध्यरात्री महिलेचा पती महेंद्र याने तिला पोटदुखीचे कारण सांगून रुग्णालयात नेण्याचा बहाणा केला. पण रुग्णालयाऐवजी तो तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला, जिथे त्याचे तिघे मित्र आधीच दबा धरून बसले होते. अचानक या तिघांनी दरोडा टाकल्याचा आव आणत हल्ला चढवला आणि महिलेला निर्दयीपणे चाकूने ४०–४५ वार केले. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर महेंद्र किरकोळ जखमी झाला.
या खुनाचा तपास करण्यासाठी खंडव्याचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार राय यांनी विशेष दोन पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर आणि चौकशीतून महेंद्रचे मित्र हेमंत उर्फ कान्हा याच्यावर संशय गेला. कठोर चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याने पोलिसांना सांगितलं की, महिलेच्या पतीनेच पत्नीची हत्या करण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. आरोपींकडे हत्येसाठी वापरलेला चाकू आणि अॅडव्हान्स म्हणून दिलेले १० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
तपासात समोर आलं की, महेंद्र याचे हे दुसरे लग्न होते. पत्नीचे वागणे कुटुंबीयांशी योग्य नव्हते, शिवीगाळ करणे, सतत वाद घालणे यामुळे तो त्रस्त झाला होता. त्यातूनच त्याने पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला आणि मित्रांना यात ओढलं.
या प्रकरणात पोलिसांनी
महेंद्र (पती व मुख्य आरोपी),
हेमंत उर्फ कान्हा,
आर्यन
या तिघांना अटक केली आहे. चौथा आरोपी राजेंद्र अद्याप फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलेच्या खुनाचा कट रचणारे आरोपी ‘क्राईम पेट्रोल’चे अनेक भाग पाहून गुन्ह्याचं नियोजन करत होते. तेथूनच त्यांनी लुटमारीचा बनाव करण्याची कल्पना उचलली होती.
ही घटना उघड झाल्यानंतर दिग्रिससह संपूर्ण खंडवा जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. एका नवऱ्याने पत्नीची हत्या करण्यासाठी इतक्या थराला जाऊन सुपारी देणं, आणि मित्रांनी ती निर्दयीपणे अंमलात आणणं, यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत असून फरार आरोपी राजेंद्रचा शोध सुरू आहे.