
माणदेश एक्सप्रेस न्यूज | कवठेमहांकाळ :
कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी गावाजवळ घाटनांद्रे रोडवर सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आलेल्या एका खून प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. २८ वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव सुनील विलास शिंदे (वय २८, रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ) असे असून, तो शेतीसाठी ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी सकाळी घाटनांद्रे रोडलगत त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.
मृतदेहाजवळच मोठा दगड रक्ताने माखलेला अवस्थेत सापडला. प्राथमिक तपासात याच दगडाने सुनीलच्या डोक्यावर वार करून त्याचा निर्घृण खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेहाची स्थिती पाहता हा हल्ला अत्यंत क्रूर आणि नियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली.
घटनास्थळाची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक जोतीराम पाटील आणि उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून श्वानपथक व फॉरेन्सिक टीमला तात्काळ पाचारण केले. गुन्हेगाराचा थांगपत्ता लागू शकेल यासाठी घटनास्थळाचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. तथापि, खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबातील किंवा वैयक्तिक वाद, तसेच अन्य कारणांचा तपास पोलिस करत आहेत.
अत्यंत निर्घृण पद्धतीने झालेल्या या खुनामुळे तिसंगी, घाटनांद्रे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सकाळपासूनच गावात चर्चांना ऊत आला असून, आरोपीला तातडीने पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अनेक ठिकाणी तपासाचे जाळे पसरवले असून, लवकरच आरोपीचा शोध लागेल, असा विश्वास पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी व्यक्त केला आहे.