
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील प्रसिद्ध असणाऱ्या महाशिवरात्र यात्रेनिमित्त भरलेल्या खिलार जनावरांच्या बाजारात जनावरांची मोठी उलाढाल झाली असून इंदाजे साडेबतीं ते चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.
करगणी ते बाळेवाडी रस्ताच्या दुतर्फा पसरलेल्या विस्तृत माळरानावर यात्रा भरली होती. खिलार खोंड, वळू आणि बैलांना विक्रीसाठी दाखल केले होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या मिरवणुका काढल्या. सांगली, सातारा सोलापूर कर्नाटक या भागांतून शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने आले होते.
यात्रेत सहा हजारांवर आवक तर चार कोटीवर उलाढाल झाल्याचे बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी सांगितले. लहान खोंड, बैल आणि प्रज्योत्पादनासाठी वापरणाऱ्या वळूची संख्या जास्त होती तर शर्यतीच्या बैलाची संख्या मोजकीच होती. अत्यंत देखण्या खिलार खोडाच्या किमती पंधरा हजारांपासून एक लाखापर्यंत होत्या. तर प्रज्योत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळू आणि शर्यतीच्या बैलांच्या किमती लाखापासून तीन ते पाच लाखांपर्यंत होत्या. संपूर्ण यात्रेचा परिसर बाजार समिती आणि ग्रामपंचायतीने यात्रेच्या पार्श्वभूमीवर खिलार झाडे काढून स्वच्छ मैदान केले होते. यात्रेत जागोजागी विजेची आणि पाण्याची ही सोय केली होती.