
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | कागल :
कागल तालुक्यातील दूधगंगा नदीच्या पुलावर सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील दादा ज्ञानू पाटील (वय ३७) या तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेमुळे त्यांची दुचाकी पुलावर अडकली आणि ते थेट नदीपात्रातील दगडांवर कोसळले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दादा पाटील हे शेती व्यवसाय करत होते. रविवारी ते आपल्या दुचाकीवरून (एमएच १० बीके २८०३) एकटेच आदमापूर (ता. भुदरगड) येथे संत बाळूमामांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते रात्री उशिरा गावाकडे परतत असताना कागलजवळील सिध्दनेर्ली परिसरात हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दूधगंगा नदीच्या पुलावरून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा इतका जबर परिणाम झाला की दुचाकी पुलाच्या लोखंडी अँगलमध्ये अडकली, तर पाटील हे दुचाकीवरून दूर फेकले गेले. खाली नदी पात्रात पडून त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. रात्री उशिरा झालेल्या या घटनेनंतर सकाळी स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने कागल पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
या प्रकरणी कागल पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, दादा पाटील यांच्या मृत्यूने करगणी व परिसरात शोककळा पसरली आहे. मेहनती, मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने करगणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.