
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी (प्रतिनिधी) : करगणी (ता. आटपाडी) येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा सखोल व निःपक्षपाती तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सदर प्रकरणात आटपाडी पोलीस ठाणे येथे आरोपो विरुद्ध विविध कलमाअंतर्गत विविध गुन्हे नोंद आहेत.
या प्रकरणाचा तपास विटा पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक कांबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींकडून मोबाईल फोन व घटनास्थळावरील डीव्हीआर मशीन जप्त केले आहे. ही उपकरणे पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, कोल्हापूर येथे पाठविण्यात आली आहेत.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सदर तपासात कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा नेत्याचा हस्तक्षेप नाही, तपास पूर्णपणे निःपक्षपातीपणे चालू आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ/व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यामध्ये एका खाजगी व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोलीसांचे नाव घेऊन आरोपी न करण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याचे समोर आले आहे.
याची गंभीर दखल घेत मा. पोलीस अधीक्षक सांगली श्री. संदीप घुगे (भा.पो.से.) यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. व्हायरल क्लिपमध्ये आवाजातील व्यक्तीची ओळख पटविणे, पैशाची मागणी कोणी केली, कोणाकडे केली याचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत कायदेशीर चौकशी करून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.