
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी दिल्ली : हरियाणातील प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरविल्याचा संशय तिच्यावर असून, ती सध्या पोलीस कोठडीत आहे. दररोज नव्या आणि धक्कादायक माहितीचा उलगडा होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती २०२३ ते २०२५ दरम्यान पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश उर्फ एहसान-उर-रहीमच्या संपर्कात होती. अद्याप थेट संवादाच्या स्पष्ट नोंदी सापडलेल्या नसल्या, तरी दोघांमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात गुप्त संपर्क झाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.
ज्योतीने ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील हालचाली, ब्लॅकआउट्स आणि सुरक्षा यंत्रणांचे तपशील पाकिस्तानला पाठवल्याचे समोर आले आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून ती ही माहिती गोळा करून सीमेपलीकडे पाठवत होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
ज्योतीकडून पोलिसांनी तीन मोबाईल फोन्स आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. हे सर्व फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असून, तिच्या दोन बँक खात्यांचीही चौकशी सुरू आहे. आर्थिक देवाणघेवाण, परकीय निधी आणि डिजिटल पुरावे सध्या तपास यंत्रणांच्या केंद्रस्थानी आहेत.
ज्योतीच्या युट्यूब चॅनेलला ३.७७ लाख सबस्क्रायबर्स असून, इन्स्टाग्रामवर १.३३ लाख फॉलोअर्स आहेत. पोलिसांना शंका आहे की, या सोशल मिडिया प्रभावाचा वापर करूनच तिने गुप्त माहिती गोळा केली आणि पाकिस्तानला दिली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, गेल्या दोन आठवड्यांत पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून १२ हून अधिक व्यक्तींना हेरगिरीच्या आरोपांत अटक करण्यात आली आहे. ज्योतीसोबतच पंजाबमधील गजाला नावाच्या ३१ वर्षीय महिलेलाही अटक झाली असून, तीही पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होती.