
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | बारामती :
जुन्या वादाच्या कारणावरून चुलत्यासह चुलतभावाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बारामती तालुक्यातील पारवडी (इंगळे वस्ती) येथे बुधवारी (दि. १०) रात्री घडली. सौरभ विष्णू इंगळे (वय २५, रा. इंगळे वस्ती, पारवडी, ता. बारामती) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सौरभचा चुलता रामदास जगन्नाथ इंगळे व त्याचा मुलगा प्रमोद रामदास इंगळे या बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास सौरभ व प्रमोद यांच्यात जुन्या वादाच्या कारणावरून बोलाचाली सुरू झाली. यावेळी रामदास इंगळे याने सौरभ याला शिवीगाळ केली. दोघांमध्ये बाचाबाची होताच, प्रमोद व सौरभ यांच्यात मारहाण सुरू झाली. त्याचवेळी रामदास इंगळे याने सौरभला पाठीमागून धरून ठेवत आपल्या मुलाला “हा सुटू नये, याला मार” असे उद्युक्त केले.
यानंतर प्रमोद इंगळे याने संतापाच्या भरात जवळील टोकदार हत्याराने सौरभच्या गळ्याच्या खाली उजव्या बाजूला वार केला. या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला आणि तो रक्ताने माखून कोसळला.
जखमी सौरभला त्याचा मामा संतोष उत्तम गाडेकर यांनी तातडीने उपचारासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू करण्याआधीच तो मृत झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे मारहाणीच्या घटनेनंतर आरोपी बाप-लेक रामदास व प्रमोद इंगळे हेच बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले होते. पण त्याचवेळी सौरभचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
या घटनेची फिर्याद मृत सौरभची आई सुनीता विष्णू इंगळे यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार दोन्ही आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती पोलिस करत आहेत.
घटनेमुळे इंगळे वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे. तरुण वयात सौरभचा जीव गेलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, जुन्या वादातून जीव घेणाऱ्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्येही संतापाचे वातावरण आहे.