मुंबईत जिओचं नेटवर्क अचानक डाऊन, तासाभरातच 10 हजार तक्रारी

0
166

लालबागचा राजा मंडपातून बाहेर आला असून हजारो गणेशभक्तांनी मिरवणूकस्थळी गर्दी केली असून बाप्पांना निरोप देण्यासाठी, बाप्पांच्या निरोपाचा क्षण डोळे भरुन पाहण्यासाठी गणेशभक्त आतुरल्याचं दिसून आलं. प्रत्यक्ष मुंबईत (Mumbai) आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक टीव्हीवर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवर पाहिली जात आहे. मात्र, विसर्जनासाठी लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडण्याचा उत्सव सुरू असतानाच मुबंईत जिओचं (Jio) नेटवर्क बंद झाल्याने नेटीझन्सने संताप व्यक्त केला. तब्बल पाऊणतास हे नेटवर्क बंद झाल्याने सोशल मीडियावरही अंबानींना ट्रोल करण्यात आलं.

मुंबईत जिओचं नेटवर्क अचानक डाऊन झाल्याने सोशल मीडियातून नेटीझन्सने जिओसह अंबानींना ट्रोल केलंय. ट्विटरवर काहींनी पोस्ट करत जिओबद्दल अंबानींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर, अनेकानी तक्रारी दाखल केल्या आहेत. मुंबईत राहणाऱ्या अनेकांनी ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करत जिओचं नेटवर्क गंडल्याचा पुरावाच दिला आहे. जिओचं नेटवर्क गायब झाल्याने ना फोन कॉल्स सुरू होते, ना इंटरनेट सेवा, त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.

10 हजार पेक्षा जास्त तक्रारी
आम्ही सर्वर डाऊन संदर्भात रिपोर्ट देणाऱ्या वेबसाईट डिटेक्टरवर जाऊन जिओ नेटवर्क डाऊनसंदर्भात माहिती घेतली. त्यानुसार, 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.15 नंतर दुपारी 12.30 वाजेपर्यंत नेटवर्क डाऊन झाल्याचं निदर्शनास आलं. बातमी लिहिपर्यंत जिओ सर्व्हर डाऊनबाबत तब्बल 10 हजार तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यावरुन, जिओच्या ग्राहकांना जिओ सीमच्या नेटवर्कमध्ये तांत्रिक अडथळा जाणवला हे स्पष्ट होतंय. कारण, स्क्रीन शॉट शेअर करण्यात आलेल्यांमध्ये एअरटेलच्या नेटवर्कमध्ये सुविधा सुरू असून जिओच्या नेटवर्कमध्ये सर्व्हर डाऊन झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे नेटीझन्सने जिओ सर्व्हर डाऊन झाल्याने रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनाही ट्रोल केलंय.