चित्रपटातून प्रसिद्धी, पण शेवट भयानक — ‘झुंड’ फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या

0
368

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नागपूर

बॉलिवूडमधील ‘झुंड’ चित्रपटातून झळकलेला अभिनेता प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर शहरातील जरीपटका परिसरात मंगळवारी (७ ऑक्टोबर) रात्री उशिरा ही घटना घडली असून, या हत्येमुळे संपूर्ण नागपूर हादरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना जरीपटका परिसरात एका तरुणावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. तत्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असता, प्रियांशू क्षत्रिय गंभीर जखमी अवस्थेत अर्धनग्न स्थितीत पडलेला आढळला. त्याच्या शरीरावर चाकू व धारदार शस्त्राने केलेल्या वारांच्या खुणा होत्या. विशेष म्हणजे, त्याला लोखंडी तारेने बांधून निर्दयतेने मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्याला मृत घोषित केलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.


या हत्येप्रकरणी पोलीसांनी लालबहादुर साहू या संशयिताला अटक केली आहे. दोघांमध्ये पूर्वी वाद असल्याची माहिती समोर आली आहे. नेमका वाद कोणत्या कारणावरून झाला आणि या हत्येमागे अन्य कोणी सामील आहे का, याचा तपास सुरू आहे.


प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री हा नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेतील या चित्रपटात त्याने ‘बाबू’ नावाची छोटी पण प्रभावी भूमिका साकारली होती. झोपडपट्टीतील फुटबॉल खेळाडूंच्या संघर्षावर आधारित या चित्रपटामुळे प्रियांशूला थोडीफार प्रसिद्धी मिळाली होती.


मात्र, चित्रपटानंतर त्याचे आयुष्य गुन्हेगारीच्या मार्गावर गेले. काही वर्षांपूर्वी ५ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर इतर काही किरकोळ गुन्ह्यांचेही आरोप होते. तरीही, तो पुन्हा अभिनयात येण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे.


या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, हत्या वैयक्तिक वादातून झाली का की इतर कोणत्यातरी कारणाने, याबाबत तपास सुरू आहे.

नागपूरसारख्या शहरात ‘झुंड’सारख्या चर्चित चित्रपटात भूमिका केलेल्या तरुणाची अशी निर्घृण हत्या झाल्याने चित्रपटसृष्टी आणि स्थानिक कलावर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here